महाराष्ट्रमुंबई

पीडितांना व दुर्घटनाग्रस्तांना लालबागचा राजा अश्याप्रकारे करणार नागरिकांना मदत !

मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्य असणारा ‘पान-सुपारी’ कार्यक्रम २४ सप्टेंबर रोजी राजाच्या दरबारात होणार आहे. यंदा दरडग्रस्त इर्शाळवाडीतील पीडितांना मदत करून दुर्घटनेमध्ये मदत केलेल्या हातांचा सन्मान केला जाणार आहे.

मुंबईसह देश-विदेशातील गणेशभक्त श्री गणरायाची वाट बघत असतो. गणपती बाप्पाच्या अशा भक्तांसाठी मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. ‘पान-सुपारी’ हा त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि लालबागच्या राजाच्या परंपरेतील महत्त्वाचा कार्यक्रम असतो. ‘पान-सुपारी’मध्ये मंडळाकडून आपले सामाजिक दायित्व जपले जाते. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्ती, सामाजिक संघटना यांचा सन्मान केला जातो. यंदा २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा कार्यक्रम राजाच्या दरबारात होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव यंदा १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२३ दरम्यान साजरा होणार आहे. या गणेशोत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन अर्थात फोटो सेशन आज सायंकाळी ठीक ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. गणेशभक्तांना राजाचे सर्वप्रथम दर्शन विविध समाजमाध्यमांसह वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून करता येईल, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.

या वेळी इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना सढळ हस्ते आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. शिवाय, पीडितांच्या पुनर्वसनातनदेखील सहकार्य केले जाणार आहे. याशिवाय या दुर्घटनेत आपल्या जीवाची बाजी लावून मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मानदेखील केला जाणार आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button