लिंबाच्या सरबतामुळे मुतखडा विरघळून लघवीवाटे शरीरातून बाहेर पडतो; पण यात किती तथ्य आहे?

आरोग्य : युरिक ऍसिडची वाढती पातळी, जीवनशैलीतील घातक सवयी यामुळे किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास आता अगदी कॉमन झाला आहे. कोणत्याही वयोगातील व्यक्तीला हा त्रास जाणवू शकतो. जितका आजार सामान्य होतो तसेच त्याचे उपचारही वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत असतात. अलीकडे आजरांचे निदान ते उपचार सगळ्यांसाठीच ऑनलाईन स्रोत उपलब्ध आहेत. किडनी स्टोन सुद्धा याला अपवाद नाही, अनेक सोशल मीडिया साईट्स व सर्च इंजिन प्रश्नांमध्ये किडनी स्टोनचे उपचार शोधले जातात. अशावेळी एक सल्ला हल्ली बराच व्हायरल होत आहे तो म्हणजे किडनी स्टोनवर लिंबू पाणी प्रभावशाली ठरते. लिंबाच्या सरबतामुळे मुतखडा विरघळून लघवीवाटे शरीरातून बाहेर पडतो असे अनेकजण सांगतात पण यात किती तथ्य आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
लिंबू सरबत तुमच्या किडनी स्टोनचा त्रास कमी करू शकते का? डॉ दिनेश कुमार टीपी, सल्लागार, युरोलॉजी, एंड्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन, मणिपाल हॉस्पिटल बंगळुरू यांनी सांगितले की, लिंबूवर्गीय फळांच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते, जे एक अँटिऑक्सिडेंट आहे, तर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुळे मुतखडे तयार होण्यास प्रतिबंध घालता येतो. शिवाय लिंबूवर्गीय पेय (लिंबाचे सरबत, संत्री- मोसंबी ज्यूस, इत्यादी) लघवीमध्ये सायट्रेटचे प्रमाण वाढवते. हे सायट्रेट शरीरातील ऑक्सलेटशी जोडले जाऊन मुतखडे तयार होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
थोडक्यात काय तर यामुळे स्फटिकाची निर्मिती थांबते. परंतु सायट्रिक ऍसिडमुळे अगोदरच तयार झालेले मुतखडे विरघळून जातात हे सिद्ध करणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. यासाठी वैद्यकीय उपचारच आवश्यक आहेत. तसेच, प्रत्येक किडनी स्टोन वेगळा असतो. काही कॅल्शियम, स्ट्रुवाइट, युरिक ऍसिड आणि सिस्टिन यांनी तयार होतात. तर अप्पर युरिनरी ट्रॅक्ट बॅक्टेरिया इन्फेक्शन (यूटीआय) मुळे स्ट्रुव्हाइट स्टोन होतात, ज्यामुळे अमोनिया तयार होतो आणि लघवी कमी आम्लयुक्त बनते. हे सहज मोठे होतात. सिस्टिन एक अमीनो आम्ल आहे, ज्याचे प्रमाण वाढल्यास मूत्रात दगड होऊ शकतात.



