पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रूग्णालयात रोज १० हजार रुग्णांवर उपचार

पिंपरी : राज्य शासनाच्या रूग्णालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. शासनाच्या आरोग्य यंत्रणेचा पुरता पंचनामा झाला असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रूग्णालयात वैद्यकीय सेवा या दर्जेदार असल्यामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्य भरातील उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या सर्व रूग्णालयांसह, दवाखान्यात दररोज बाह्य रूग्ण विभागात सुमारे १० हजार रूग्ण उपचारासाठी येत आहे. तर आंतररूग्ण विभागात दररोज बाराशे रूग्ण उपचारासाठी येत आहेत. तर पालिकेच्या कोणत्याही रूग्णालयात औषधांचा तुटवडा नसल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूने वाढत असतानाच ३० लाखांच्या आसपास लोकसंख्या गेली आहे. एकीकडे महागाईच्या काळात वैद्यकीय उपचार सर्वसामान्य रूग्णांच्या आवाक्याबाहेर जात आहे. मात्र, पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस दर्जेदार होत आहेत. वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये ८ मोठी रुग्णालये, ३० दवाखाने, २० आरोग्य केंद्र, ८ कुटुंब नियोजन केंद्र, ३६ लसीकरण केंद्र आहेत. ७५० खाटांच्या क्षमतेचे सर्वात मोठे वायसीएम, ४०० खाटांचे थेरगाव रूग्णालय, १०० खाटांचे नवीन भोसरी, १३० खाटांचे नवीन आकुर्डी रूग्णालय, १२० खाटांचे नवीन जिजामाता यासह १ हजार ५८९ खाटांची व्यवस्था महापालिकेच्या रूग्णालयात आहेत.
महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक यंत्र सामुग्री, उत्तम दर्जाची सेवा, साफ-सफाई ही उत्तम दर्जाची आहे. यामुळेच शहर परिसर, जिल्ह्यासह राज्यभरातील रूग्ण पालिकेच्या रूग्णालयात उपचारासाठी येत आहेत. बाह्य रूग्ण विभागात दररोज दहा हजार तर आंतर रूग्ण विभागात १२०० रूग्ण उपचार घेत आहेत. महापालिकेच्या दवाखाने आणि रूग्णालयासाठी ३० ते ३५ औषध एजन्सीकडून औषधे खरेदी केली जाते. दोन वर्षांसाठी निविदा प्रक्रिया राबवून भांडार विभागाकडून वेळच्या वेळी औषध खरेदी केली जाते. त्यामुळे कोणत्याच औषधांचा तुटवडा जाणवत नाही. औषधांसाठी महापालिका वर्षाला सुमारे २० कोटी रूपयांचा खर्च करते.
महापालिकेच्या ८ रूग्णालये आणि ३० दवाखान्यात मिळून सुमारे १० हजार रूग्ण बाह्य रूग्ण विभागात उपचारासाठी येत आहेत. तर आंतर रूग्ण विभागात सुमारे बाराशे रूग्ण येत आहेत. कोणत्याही रूग्णालयात औषधांचा तुटवडा नाही.– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी
रूग्णालयओपीडी आयपीडी –
वायसीएम – २०००५५० थेरगाव – १४००२५० आकुर्डी – ७००१२५ भोसरी – ६५०१२५
जिजामाता – ७००१०० तालेरा – ५००२५ युमनानगर – ३५०२० सांगवी – १७५१०
३० दवाखाने – ३०००- एकूण – ९४७५१२०५



