महाराष्ट्रमुंबई

सहा महिन्यांत एक कोटी ४६ लाख ज्येष्ठांनी घेतला मोफत एसटी प्रवासाचा लाभ

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या मोफत एसटी प्रवासाचा लाभ गेल्या सात महिन्यांत एक कोटी ४६ लाख नागरिकांनी (प्रत्यक्षात १४ लाख) घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या सवलतीच्या बदल्यात शासनाला ९८ कोटी ४६ लाख रुपये एसटी महामंडळाला दावे लागणार आहेत.

जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ग्रामीण भागात आवडत्या लालपरीमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांची संख्या वाढल्याचे आढळले. एखाद्या प्रवाशाने १० वेळा प्रवास केल्यास ते दहा प्रवासी मोजले जातात. त्यामुळे ही संख्या एक कोटी होते. म्हणजेच सात महिन्यांत प्रत्यक्षात सुमारे १४ लाख ज्येष्ठांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महिला-मुलींना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर या प्रवाशांचीही संख्या वाढली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात १६ हजार बस आहेत. ग्रामीण भागातील हक्काचे प्रवास साधन असलेल्या या सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या ५५ लाख आहे. एसटी गाडय़ांच्या दिवसाकाठी एक लाख फेऱ्या होतात. सरकारने  ४३ समाजघटकांना एसटी प्रवासात  सवलत दिली आहे. त्यात स्वातंत्रसैनिकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या नागरिकांचा समावेश आहे. ६५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांना ५० टक्के सवलत आहे, मात्र ७५ वर्षांच्या ज्येष्ठांना एसटी प्रवास मोफत आहे.

कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने महिलांसाठी मोफत एसटी प्रवासाची ‘शक्ती योजना’ गेल्या जूनपासून राबवण्यास सुरुवात केली. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मोफत प्रवास असल्याने महिला एसटी बस प्रवासाला प्राधान्य देतात. ही योजना दहा वर्षे  सुरू राहणार असल्याचे कर्नाटकच्या परिवहनमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरीक एसटीतून धक्के खात प्रवास कसे करतील, अशी शंका उपस्थित केली गेली होती, मात्र ती फोल ठरली आहे. अनेक ज्येष्ठांनी गावापासून तालुक्यापर्यंत मोफत प्रवासाचा पुरेपूर लाभ घेतला. अनेकजण तालुक्याच्या ठिकाणी फेरफटका मारण्यास  वारंवार जात असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button