महाराष्ट्र

अस्वच्छता करून पुणेकरांनी भरला १२ लाख ४८ हजार रुपयांचा दंड

पुणे : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी आतापर्यंत एक कोटी रुपयांचा दंड महापालिका प्रशासाने वसूल केला आहे. सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे अशा कारणांसाठी हा दंड करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्वच्छता उपविधी केली आहे. त्यानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १ हजार २४८ नागरिकांकडून १२ लाख ४८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी लघूशंका करणाऱ्या ८५८ नागरिकांकडून १ लाख ८१ हजार ६७० रुपये तर कचरा जाळणाऱ्या १ हजार २६३ नागरिकांकडून ७ लाख ९ हजार १०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याप्रकरणी २ हजार ६४ नागरिकांकडून ४ लाख ३ हजार रुपये दंड घेण्यात आला असून, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ३० हजार १२९ नागरिकांकडून ९५ लाख ६५ हजार रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

कचरा प्रक्रिया बंद असणाऱ्या सोसायट्यांकडूनही २ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर बांधकामाचा राडारोडा टाकल्याप्रकरणी २९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. प्लास्टिक विक्री करणाऱ्या ५४८ व्यावसायिकांकडून २७ लाख ११ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button