शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल कधी? विधानसभा अध्यक्षांनी सांगूनच टाकलं

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी उद्यापासून सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अपात्रता याचिका विधिमंडळ अध्यक्ष कार्यालयाकडे दाखल केलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जी मुदत दिली आहे, त्या मुदतीत हा निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न असेल, अशा अनेक याचिका दोन्ही गटाकडून आल्या आहेत, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
याचिका एकत्रित करण्याचा निर्णय अथा सुनावणी कुठल्या प्रक्रियेत घ्यायची, हा निर्णय सर्व बाबींवर उद्या दोन्ही बाजू ऐकून घेऊ, असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. तसंच शिवसेना निकालात मला काही अडचण दिसत नाही, वेळेत निकाल द्यायला काही अडचण दिसत नसल्याचं मोठं विधानही राहुल नार्वेकर यांनी केलं आहे, त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल १० जानेवारीपर्यंत येणार हे स्पष्ट झालं आहे. डिसेंबर महिन्यातल्या हिवाळी अधिवेशनावेळी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी संपली. सुरूवातीला कोर्टाने ३१ डिसेंबरपर्यंत याप्रकरणाचा निकाल देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले होते, यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आणखी ३ आठवड्यांची मुदत मागितली होती, त्यावर सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत निकाल द्यायला सांगितलं होतं.
जुलै महिन्यामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार गटाकडून आम्हाला ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा तसंच आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला गेला. या प्रकरणाची सुनावणी निवडणूक आयोगातही सुरू आहे. निवडणूक आयोगात अजित पवार गटाने आमदारांच्या पाठिंब्याचं प्रतिज्ञापत्रही दिलं आहे.



