महाराष्ट्र

अटल सेतूवर २६४ वाहन चालकांवर कारवाई, वाहने उभी करून सेल्फी काढणाऱ्यांची संख्या अधिक

मुंबई : शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू सामान्य नागरिकांसाठी सुरू केल्यानंतर रविवारी रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून सेल्फी काढणाऱ्यांची संख्याच अधिक दिसून आली. यावेळी अटल सेतूवर वाहन उभे करून इतर प्रवशांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी २६४ वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या चालकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या १० किलोमीटर ४०० मीटर एवढ्या हद्दीच्या वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलीस पाहत आहेत. उर्वरीत १० किलोमीटर ४०० मीटर भागाची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांकडे आहे. रविवारी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारे बहुतांश प्रवासी केवळ सेतू पाहण्यासाठीच तेथून प्रवास करत होते. यावेळी सहकुटुंब आलेले अनेक नागरिक सुरक्षेची, स्वच्छतेची काळजी घेताना दिसत नव्हते. अनेक नागरिक रस्त्याच्या एका बाजूला गाड्या थांबवून सेल्फीचा छंद पूर्ण करताना दिसत होते. पोलिसांनीही अटल सेतूवरील चालकांना गाडी न थांबवण्याची विनंती केली. त्यानंतरही अनेक नागरिक वाहन रस्त्याच्या शेजारी थांबवत होते. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी सागरी सेतूवर १२० वाहन चालकांवर कारवाई केली. नवी मुंबई पोलिसांनी १४४ वाहन चालकांवर कारवाई केली. मोटर वाहन कायदा कलम १२२ व १७७ कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वाहन चालकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. भविष्यात अशा चालकांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीस विचार करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button