भोंदू बाबांच्या जाहिरातीला चाप लावण्यासाठी ‘या’ महिला आमदाराने घेतला पुढाकार!

मुंबई : मध्य रेल्वेत भोंदू बाबांच्या जाहिराती लावून रेल्वेचे विद्रुपीकरणासोबतच अंधश्रद्धेला खतपाणी घालून दरवर्षी हजारो नागरिकांना फसविण्याच्या प्रकरणाच्या विरोधात शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी पुढाकार घेतला असून आज लोहमार्ग पोलीस आयुक्तांना याबाबत योग्य कारवाई करण्याचे निवेदन सादर केले.
याविषयी अधिक माहिती देताना शिवसेना सचिव, आमदार डॉ. मनीषा कायंदे सांगतात, ” मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये भोंदू बाबांच्या जाहिराती चिटकवणाऱ्या विशेषतः मस्जिद बंदर रेल्वे स्थानकांत काही टोळ्या कार्यरत आहेत. हजारो प्रवाशांच्या देखत तरुणांची टोळी उपनगरी रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये घुसून जाहिराती चिटकवत आहे. असे प्रकार महिलांच्या डब्यातही घडत आहेत.
यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असते. भोंदूबाबांच्या फसव्या दाव्यांमुळे काही महिला त्यांच्याशी संपर्क साधतात आणि स्वतःची फसवणूक करून घेतात. त्यांना लूटण्यात येते. त्यांचा मानसिक, शारिरीक छळ करण्यात येतो. या प्रकाराला वेळीच आळा घातला, तर अनेकांना फसवणूक होण्यापासून वाचवता येऊ शकते.
मध्य रेल्वे दिवसेंदिवस आपले कोच बदलतेय, प्रवाशांना प्रसन्न वाटावं म्हणून रंगसंगतीत बदल करतेय, पण हे भोंदूबाबा हा कोच विद्रुप करुन टाकत आहेत . या देशात अंधश्रद्धा आणि रेल्वेला नुकसान पोहोचवणाऱ्यांविरोधात कायदा असून यांचा योग्य वापर रेल्वे प्रशासनाने तातडीने करावा हीच आमची मागणी आहे. ”
भविष्यात महिलांना रेल्वेने सुरक्षित प्रवास करता यावा तसेच अनुचित घटना घडू नये यासाठी शिवसेना सचिव आमदार डॉ. मनीषा कायंदे लवकरच अतिरिक्त पोलीस महासंचालक रेल्वे सुरक्षा डॉ प्रज्ञा सरवदे, पोलीस आयुक्त ( रेल्वे ) डॉ. शिसवे तसेच महाव्यवस्थापक मध्य रेल्वे शुक्ला यांची भेट घेऊन पुढील कारवाईची मागणी करणार आहेत.


