मुंबई महापालिका प्रशासनाच्या कर निर्धारण व संकलक विभागाने मालमत्ता कर बुडव्यांची यादी जाहीर केली जाहीर

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाच्या कर निर्धारण व संकलक विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पालिकेने आतापर्यंत मलामत्ता करापोटी सुमारे १२०० कोटी रुपये वसूल केले आहेत. अद्याप साडेतीन हजार कोटी रुपयांची वसुली शिल्लक असून मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. २४ प्रशासकीय विभागांतील १४२ बड्या थकबाकीदारांची यादी प्रशासनाने तयार केली असून मालमत्ता कर वसुलीसाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, १० बड्या थकबाकीदारांची महानगरपालिकेला देय असलेली थकीत रक्कम सुमारे १४७ कोटी २४ लाख ७२ हजार १८ रुपयांवर पोहोचली आहे.
पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाने चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यास २७ फेब्रुवारीपासून सुरूवात केली आहे. तसेच ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने विविध उपाययोजना आखल्या आहेत. कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन विभाग कार्यरत आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी अतिशय सुक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. विभागीय स्तरावर कार्यालयीन दिवशी, तसेच सुट्टीच्या दिवशी करदात्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कर वसुलीचे काम सुरू आहे. समाज माध्यमांद्वारे संपर्क साधून, तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय कर वसुलीचे काम सुरू आहे. करदात्यांना ध्वनिक्षेपकावरून, ठळक बॅनर झळकवून, तसेच स्थानिक केबलद्वारे जनजागृती करून ३१ मार्च २०२४ पर्यंत करभरणा करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. त्यापैकी काही थकबाकीदारांनी धनादेश, धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे.
नागरिकांनी थकीत मालमत्ता कर तातडीने महानगरपालिकेकडे जमा करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. जनजागृती, वारंवार आवाहन, मोबाइलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांबाबत कठोर पावले उचलण्यास कर संकलन विभागाने सुरूवात केली आहे. पालिका प्रशासनाने सर्वाधिक कर थकवणाऱ्या मोठ्या दहा कंपन्यांची नावे जाहीर केली आहेत. नागरिकांना विविध सेवा – सुविधा देणाऱ्या महानगरपालिकेचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. पालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराचे उद्दीष्ट्य ४५०० कोटींवर सुधारित केले आहे. अद्याप केवळ १२०० कोटी रुपयांची वसुली झाली असून महिन्याभरात ३३०० कोटी वसूल करावे लागणार आहेत.
१४ मार्च रोजीच्या सर्वाधिक दहा मालमत्ता कर थकबाकीदारांची आकडेवारी
१. मे. एल एण्ड टी क्रॉसरोड – ४१ कोटी ३८ लाख ८९ हजार ८३५
२. भारत डायमंड बोर्स – २५ कोटी ८७ लाख ६८ हजार १७०
३. सीजुली प्रॉपर्टी लि. – २४ कोटी ८९ लाख ६१ हजार ६९७
४. वर्मा मेडिसिन रिसर्च ट्रस्ट (ग्लोबल हॉस्पिटल) – १६ कोटी ६४ लाख ४२ हजार ०९६
५. श्री डी. व्ही. सेठ एण्ड ऑदर्स (प्राईम मॉल) – ११ कोटी ५० हजार ८५१
६. फिनिक्स मॉल – १० कोटी ८२ लाख ८८ हजार १८०
७. हिंदुस्थान प्लॅटिनम प्रायव्हेट लिमिटेड – १० कोटी १५ लाख ९४ हजार ६५
८. गोदरेज ग्रीन होम प्रायव्हेट लिमिटेड – १० कोटी ५७ लाख ४८ हजार ३८६
९. मुक्ता फाऊंडेशन – ६ कोटी ६६ लाख १८ हजार १८९
१०. चंपकलाल – ४ कोटी ८१ लाख १७ हजार ४५७


