बेस्ट मालामाल, प्रवासी घामाघूम; ‘आयपीएल’साठी ५०० बस आरक्षित

मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या सामन्यावेळी विशेष मुलांना स्टेडियमवर आणण्यासाठी ‘एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स ऑफ ऑल’ या संस्थेने बेस्टच्या ५०० बस आरक्षित केल्या होत्या. यामुळे बेस्टला ६० ते ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले खरे, मात्र दुसरीकडे दैनंदिन बस प्रवाशांना याचाच फटका सहन करावा लागला. अनेक मार्गांवरच्या बस २० ते २५ मिनिटे उशिरा धावल्यामुळे प्रवाशांना कडक उन्हात ताटकळत बसची प्रतीक्षा करावी लागल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. ‘एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स ऑफ ऑल’ने जवळपास १८ हजार मुलांना आयपीएल सामना पाहता यावा, यासाठी वातानुकूलित, विना वातानुकूलित, दुमजली, अशा ५०० बस घेतल्या होत्या. आधीच ताफ्यात बेस्टच्या बस कमी आहेत. उपक्रमाने बस ताफा वाढवण्याचा संकल्प केला असला तरी ते उद्दीष्ट साध्य झालेले नाही. जुन्या बस भंगारात काढल्यामुळे बसची संख्याही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आधीच बस फेऱ्यांची संख्या घटली आहे. बससाठी बस थांब्यावर प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागू लागत आहेत. बऱ्याच वेळाने येणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यातच गुरुवारी ५०० बसचा तुटवडा जाणवल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यामुळे सामान्य प्रवाशांसह अनेक संघटनांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. प्रवाशांच्या सहनशक्तीचा उद्रेक झाल्यास त्याला बेस्ट उपक्रम जबाबदार असेल, अशा प्रतिक्रिया संघटनेने दिली आहे.
एका बससाठी प्रति किमी अंतर आणि बस उभी करण्याचा कालावधी मोजून साधारणपणे १२ ते १८ हजार रुपये आरक्षित रक्कम भरावी लागते. मुंबईत झालेल्या आयपीएलच्या सामन्यामुळे बेस्टला ६० ते ८० लाख रुपयांदरम्यान महसूल मिळाल्याचा अंदाज आहे.
सेवाभावी संस्थेकडून विशेष मुलांसाठी ही बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. भविष्यात आयपीएलच्या सामन्यासाठी अद्याप तरी पुन्हा असे नियोजन नाही. – अनिल डिग्गीकर, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम


