नालासोपाऱ्यात कारखान्यात थिनर टँक स्फोट, कामगार होरपळून जखमी

वसई : नालासोपारा पूर्वेच्या उमर कंपाउंड मधील एका कारखान्यात थिनर टँकचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत एक कामगार होरपळून जखमी झाला आहे.
नालासोपारा पूर्वेच्या भागात जाबर पाडा, उमर कम्पाउंड, येथे स्कॅच इंजीनियर्स नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात गुरुवारी सकाळी कामगार थिनर टँकचे काम करीत असताना अचानकपणे स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
या लागलेल्या आगीत थिनर टँकचे काम करणारा कामगार होरपळून जखमी झाला आहे. याकूब असे या जखमी कामगाराचे नाव असून त्याला रिद्धी विनायका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याकूब हा सुमारे ९० टक्के इतका होरपळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे.


