महाराष्ट्र

महापालिका आयुक्तांनी केली पालखी सोहळा मार्गाची पाहणी

पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा मार्गाची पाहणी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली. यावेळी रस्ते दुरुस्ती, अतिक्रमण, मुक्कामाच्या ठिकाणची स्वच्छता, पावसाळी कामे करण्याच्या सूचना आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या.

शहरामध्ये ३० जून रोजी पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेच्या वतीने मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. उपायुक्त संदीप कदम, पथ विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप, मलनि:सारण विभागाचे दिनकर गोजारे, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, प्रभारी आरोग्य प्रमुख कल्पना बळीवंत, त्याचबरोबर ज्या भागातून पालखी मार्ग जातो, त्या परिसरातील साहाय्यक आयुक्त यावेळी उपस्थित होते.

मलनि:सारण विभागाला म्हस्के वस्ती, कळस येथील नाल्यावरील कल्व्हर्टची साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील सर्व चेंबर तपासून चेंबरला लोखंडी जाळी बसवणे, पावसाळी वाहिन्या तपासून तातडीने सर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वारकर्‍यांची आरोग्यासाठी सर्व परिसरातील २४ तास स्वच्छता पुरवविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. विद्युत व्यवस्था खंडित होणार नाही, याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. पालखी मार्गावर पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यास सांगितले आहे. रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलणे व त्याची विल्हेवाट लावणे. पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकर्‍यांसाठी विसावा, आराम कक्ष उभारण्यासाठी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आराम कक्षामध्ये वारकर्‍यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट इत्यादी गोष्टींची व्यवस्था असणार आहे.

वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत राहावी तसेच पालखी दिंडी सोहळ्यास वाहतुकीचा अडथळा होणार नाही याची काळजी घेण्यासही कळवले आहे. पथ विभागाच्या माध्यमातून पदपथ व रस्ते यांची डागडुजी करून घेण्याच्या सूचना यावेळी दिल्या. विसाव्याच्या ठिकाणी गर्दी आणि गैरसोय होऊ नये याकरीता उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शौचालय आणि पाण्याची व्यवस्था करावी. मुक्कामाच ठिकाणी औषध फवारणी आणि आरोग्य व्यवस्था करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button