क्रिडाविश्व

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पावो नूरमी गेम्समध्ये पटकावले सुवर्ण पदक

वृत्तसंस्था : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने दमदार पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे २६ जुलैपासून सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकआधी त्याने केलेल्या या कामगिरीमुळे नीरजकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. त्याने फिनलँडमध्ये होणाऱ्या पावो नूरमी गेम्स २०२४ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात ८५.९७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, फिनलँडच्या टोनी करनेनने ८४.१९ मीटर भालाफेक करून रौप्य पदक पटकावले तर ऑलिव्हियर हेलँडरने ८३.९६ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले.

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नामध्ये ८३.६२ मीटर भालाफेक केली. यावेळी नीरज हा पहिल्याच प्रयत्नामध्ये ८२.५८ मीटर फेकणाऱ्या पीटर्सपेक्षा पुढे राहिला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात नीरजने ८३.४५ मीटरचा भालाफेक केला. दुसऱ्या प्रयत्नानंतर ऑलिव्हियर हेलँडर हा नीरजच्या पुढे गेला होता. त्याने ८३.९६ मीटर भालाफेक केला. यावेळी दुसऱ्या फेरीत तो दुसऱ्या स्थानावर घसरला होता. पण त्यानंतर जोरदार पुनरागमन करत तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८५.९७ मीटर भालाफेक करत अव्वल स्थान पटकावत आघाडी घेतली. ही त्याची सर्वोत्तम भालाफेक ठरली. तोपर्यंत ८ भालाफेकपटूंमध्ये नीरज हा एकमेव खेळाडू होता ज्याने ८५ मीटरपेक्षा अधिक भालाफेक अंतर गाठले होते. ऑलिव्हियरला तिसऱ्या प्रयत्नात ८३ मीटरच्या पुढे जाता आले नाही आणि त्याने ८२.६० मीटर भालाफेक केला. तिसरा प्रयत्नानंतरही नीरजने आपली आघाडी कायम ठेवली.

नीरजने चौथ्या प्रयत्नात ८२.२१ मीटर भालाफेक केला .तर पाचव्या प्रयत्नात नीरजने फाऊल केले, पण या प्रयत्नातही नीरजला कोणीही मागे टाकू शकले नाही. दरम्यान, नीरजसह 3 खेळाडूंनी फाऊल केले, तर सहाव्या प्रयत्नात त्याने ८२.९७ मीटर भालाफेक केला. जुलैमध्ये सुरु होणाऱ्या ऑलिम्पिक आधी नीरज चोप्राची ही कामगिरी दिलासा देणारी आहे. कारण, टोकियोमध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरजची मधल्याकाळात सुमार कामगिरी राहिली होती. त्यामुळे या स्पर्धेमध्ये नीरज कशी कामगिरी करतो? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्याने पटकावलेल्या या सुवर्ण पदकामुळे त्याचा आणि भारतीय क्रीडाप्रेमींचा आत्मविश्वास दुणावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button