मुंबईतच मराठी माणसाची पिळवणूक,कंपनीकडून जाहिरात, मनसे आक्रमक

मुंबई : देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे, दुकानावर मराठी पाट्या न लावणे, मराठी न बोलणे हे प्रकार असताना आता मुंबईतच मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचे धाडस कंपन्या करु लागल्या आहेत. याआधीही एका गुजरातच्या एका कंपनीने डिझायनर पोस्टसाठी दिलेल्या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करु नये, असं म्हटलं होते. त्यानंतर अशाच एक प्रकार समोर आला असून, Indeed Jobs या वेब पोर्टलवर प्रोडक्शन मॅनेजर या पदासाठीची जाहिरात वादग्रस्त ठरली आहे.
या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करु नये, असं म्हटलयं आहे. या जाहिरातीमुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. इंडीड जॉबची जाहिरात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे.. या जाहिरातींच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. मुंबईतील मरोळ एमआयडीसीतील आर्या गोल्ड या कंपनीत प्रोडक्शन मॅनेजरची जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, या जाहिरातीत मराठी माणसाने अर्ज करु नये, असं म्हटल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मराठी माणसाला ‘नो एंट्री’ची माहिती मिळताच मनसे कार्यकर्ता सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे कंपनीत दाखल झाले आहेत. मराठी माणसाला ‘नो एन्ट्री’च्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. जाहिरातीतील माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून मनसे नेते, राज पक्षाचे कार्यकर्ते नेते आर्य गोल्ड कंपनीच्या परिसरात दाखल झाले आहेत. याशिवाय मनसे नेते संदीप देशपांडेही कंपनीत पोहोचले आहेत. मनसेचे कार्यकर्ते कंपनीत दाखल होताच पोलीस कंपनीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


