महाराष्ट्र

म्हाडाच्या गोरेगावमधील पीएमवाय घरांच्या किंमतीत १ लाख ९२ हजार रुपयांनी वाढ

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या गोरेगाव, पहाडी येथील पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किंमतीत एक लाख ९२ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये या योजनेतील घर ३० लाख ४४ हजार रुपयांमध्ये विकले गेले होते. आता या घरांसाठी पात्र विजेत्यांना ३२ लाख ३६ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई मंडळाच्या पहाडी गोरेगाव येथील गृहप्रकल्पातील अंदाज १९०० घरे पीएमएवाय योजनेत समाविष्ट आहेत. या घरांसाठी ऑगस्ट २०२३ मध्ये सोडत काढण्यात आली होती. पीएमएवाय योजनेनुसार तीन लाख रुपये अशी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली होती. या घरांना अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र आर्थिक किंवा इतर कारणांमुळे पीएमएवायमधील ८८ घरे विजेत्यांनी परत केली आहेत. ती रिक्त राहिल्यामुळे आता आगामी म्हणजेच २०२४ च्या सोडतीत या घरांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यावेळी या घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

पीएमएवायमधील ८८ घरांचा समावेश केल्यानंतर त्यांच्या किंमती निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार किंमतीत अडीच लाखांची वाढ करून ३३ लाख ०२ हजार रुपये अशा किंमत ठरविण्यात आली. एकूणच घरांच्या किंमतीत दोन लाख ५२ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली. यासंबंधीचे वृत्त लोकसत्ताने २ जुलैला प्रसिद्ध केले होते. किंमतीत वाढ झाल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता मुंबई मंडळाने किंमतीत अखेर कपात केली आहे. ५६ हजारांनी किंमत कमी करत आता या घरासाठी ३२ लाख ३६ हजार रुपये अशी किंमत निश्चित करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. नियमानुसार व्याजदर आकारत किंमती निश्चित करण्यात येतात. त्याप्रमाणे एक लाख ९२ हजार रुपये वाढविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button