महाराष्ट्र

पूर्व- पश्चिम उपनगरातील पाणी गळती रोखण्यासाठी २४८ कोटी ६३ लाखांचे कंत्राट

मुंबई : मुंबई महापालिकेकडून मुंबईला होणारा पाणीपुरवठा हा शुद्ध व स्वच्छ असल्याचा दावा महापालिका करते. मात्र तरीही मुंबईत अनेक ठिकाणी पाणी गळती, दूषित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा आदींबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे पूर्व उपनगरातील पाणी गळती आणि दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी महापालिका पूर्व उपनगरात कुर्ला ते मुलुंडपर्यंत आणि पश्चिम उपनगरात वांद्रे ते दहिसरपर्यंत विविध उपाययोजनांसाठी २४८ कोटी ६३ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. महापालिकेने या कामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. त्यास कंत्राटदाराचा योग्य प्रतिसाद लाभल्यावर पालिकेकडून कंत्राटदाराला कंत्राट काम देण्यात येणार आहे.

यापूर्वी सुद्धा मुंबई महापालिकेने शहर व उपनगरे भागातील पाणीपुरवठा सुरळीत करणे, २४ तास पाणीपुरवठा करण्याासठी जलवाहिन्या बदलणे, झडपा बदलणे, व्हॉल्व बदलणे आदी विविध कामांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही मुंबईकरांना पाणी गळती, पाणी चोरी, दूषित पाणीपुरवठा यांबाबतच्या समस्या भेडसावत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना ( उबाठा) गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनीही पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पाणी समस्येबाबत तक्रारी केल्या होत्या. इतर पक्षाच्या आमदार, माजी नगरसेवकांनी सुद्धा पाणी समस्येबाबत आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन पालिका आयुक्तांनी लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या अपुरा व दूषित पाणीपुरवठा, पाणी गळती आदींबाबत तातडीने दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करणे आणि पाणीपुरवठा सुरळीत करणे याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, शिवाजी नगर, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप, मुलुंड आदी भागात होणारा दूषित व अपुरा पाणी पुरवठा आणि पाणी गळती आदींबाबत उपाययोजना करण्यासाठी ११५ कोटी ६५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रूझ, खार, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, दहिसर आदी भागात होणारा दूषित व अपुरा पाणी पुरवठा आणि पाणी गळती आदींबाबत उपाययोजना करण्यासाठी १३२ कोटी ९७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. एकूणच पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणी समस्येवर उपाययोजना करण्यासाठी महापालिका तब्बल २४८ कोटी ६३ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे एवढा खर्च करूनही उपनगरातील रहिवाशांना पाणी समस्येपासून दिलासा मिळणार आहे का? याचे उत्तर पालिकेला द्यावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button