महाराष्ट्र

ग्रामपंचायत काळातील १८९ मालमत्ता झाल्या पालिकेच्या नावावर

विरार : वसई विरार महापालिकेच्या स्थापनेनंतर १४ वर्षानंतर पालिकेचा वनवास संपला आहे. ग्रामपंचायत काळापासून असलेल्या १८९ मालमत्ता पालिकेच्या नावावर झाल्या आहेत. महसूल विभागात सातबारा उतार्‍यावर या मालमत्तांवर पालिकेचे अधिकृत नाव आहे आहे. याशिवाय पालिकेने ५० भूखंड शोधले असून त्यांना कुंपण घालून ते संरक्षित केले आहेत. वसई विरार महापालिकेची स्थापना ३ जुलै २००९ रोजी झाली. त्यापूर्वी वसई तालुक्यात ४ नगरपरिषदा आणि ५२ ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. महापालिका स्थापन झाली तेव्हा या सर्व ग्रामपंचायती आणि नगरपरिषदा महापालिकेत विलीन झाल्या होत्या. मात्र ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या मालमत्ता पालिकेच्या नावावर नव्हत्या. त्यात ग्रामपंचायतीची कार्यालये, समाजमंदिरे, विभागीय कार्यालये, विविध वास्तू, मैदाने, मोकळ्या जागा, रस्ते आदींचा समावेश होता. त्यामुळे अनेकदा कायदेशीर अडचणी येत होत्या. सत्ता महापालिकेची मात्र मालमत्ता ग्रामपंयायतीचा अशी परिस्थिती होती. एकूण २५१ मालमत्ता या ग्रामपंचायतीच्या नावावर होत्या. त्यामुळे मागील वर्षी पालिकेने मालमत्ता विभाग स्थापन केला होता. त्यानुसार या सर्व मालमत्ता शोधून त्यांच्या सातबारावर पालिकेचे नाव चढविण्यात आले आहे. २५१ पैकी १८९ मालमत्तांची महसूल दप्तरी महापालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली असून उर्वरित मालमत्तांच्या नोंदी करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे (मालमत्ता) यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button