आचोळे पोलीस ठाण्याचा अनोखा उपक्रम; पोलिसांसाठी इंग्रजीचे वर्ग सुरू

विरार : पोलिसांना एरवी मोठमोठ्या गुन्हेगारांची बोलती बंद करता येते. मात्र समोर कुणी इंग्रजी बोलणारा आला की पोलिसांचीच बोलती बंद होत असते. पण तेव्हा वेळ मारून नेता येते. परंतु परदेशी आरोपी असले की पोलिसांना इंग्रजी येत नसल्याने तपासही नीट करता येत नाही. त्यामुळे पोलिसांना किमान प्राथमिक इंग्रजी बोलता यावं यासाठी आचोळे पोलीस ठाण्यात पोलिसांसाठी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. मंगळवारपासून दररोज एक तास असे दोन महिने ही इंग्रजी शिकवणी चालणार आहे. शासकीय कारभार मराठीतून करणे अनिवार्य आहे. परंतु अनकेदा अमराठी नागरिक तक्रार घेऊन येतात. त्यामुळे त्यांच्याशी पोलिसांना नीट संवाद साधता येत नाही. त्यात अमराठी आरोपी असले की ते मुद्दाम इंग्रजीत बोलून पोलिसांना अडचणीत आणत असतात. अमली पदार्थ, फसवणूक आदी प्रकरणात परदेशी विशेषत: नायजेरियन देशातील नागरिकांचा सहभाग असतो. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांची मोठी पंचाईत होते. या परदेशी आरोपींना हिंदी येत नाही आणि पोलिसांना इंग्रजी येत नाही. ते इंग्रजी भाषेतील साध्या साध्या प्राथमिक गोष्टी देखील पोलिसांना कळत नाही. परिणामी योग्य तपास करता येत नाही आणि आरोपीला फायदा होतो. बहुतांश पोलिसांचे शिक्षण हे मराठीत झालेले असते. नंतर पुढे इंग्रजीचा संबंध येत नाही. त्यामुळे पोलीस कर्मचार्यांना इंग्रजी भाषेची अडचण भेडसावत असते.


