पालघर जिल्हा पोलीस गावोगावी ‘सायबर गुन्हे मुक्त गाव मोहिम’ राबविणार

पालघर : सध्याच्या डिजिटल युगामध्ये सायबर गुन्हेगारी वाढत असून अनेक नागरिक सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकत आहेत. सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून होणारी फसवणूक आर्थिक दहशतवाद असून नागरिकांमध्ये सायबर साक्षरता निर्माण करणे तसेच फसवणूक झाल्यास अशा प्रकरणांचा छडा लावण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा पोलिसांनी सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीम राबवण्याचे योजिले आहे. या नागरिक व पोलिसांमध्ये समन्वयक म्हणून या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सायबर कमांडो व सुमारे ८०० सायबर योद्धा निर्माण करण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यात सुमारे ७७ टक्के नागरिक आदिवासी असून मोबाईल फोन व इंटरनेटचा वापर करताना वेगवेगळ्या अमिषांना बळी पडून फसवणूक होत असल्याचे दिसून आले आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियाना अंतर्गत जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार हे आपल्या गावात एकत्र येऊन सायबर गुन्हे जनजागृतीसाठी सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी, समाजातील बालविवाह, अंमली पदार्थांचे व्यसन अशा अपप्रवृत्ती दूर करण्याच्या दृष्टीने गावोगावी चित्रफित दाखवण्यात येणार आहे. तसेच यासर्व विषयांवर उपस्थित होणाऱ्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी विविध शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था व औद्योगिक आस्थापनांमध्ये असणाऱ्या प्रोजेक्टरची मदत घेण्यात येणार असून नागरिकांशी थेट जनसंवाद साधून त्यांना सायबर गुन्हेगारी बाबत प्रामुख्याने अवगत करणे व सावधगिरीच्या उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय येथील कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी तांत्रिक माहिती देण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून स्थानिक नागरिकांशी त्यांचा थेट संवाद स्थापन करण्यात दृष्टीने अशा सायबर योद्धा यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहेत. तसेच एखाद्या व्यक्तीची फसवणूक झाल्यास त्याचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था उभारण्यात येणार असून परिसरातील वित्तीय संस्था, सायबर सेलचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना दिली.
पालघर जिल्ह्यात सायबर गुन्हेची उकल प्रभावीपणे व्हावी म्हणून पालघर जिल्ह्यात पुढील महिनाभरात सायबर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विविध सायबर टूल्सने सुसज्ज असणारी सायबर लॅब उभारण्यात येणार आहे. पालघर जिल्हा पोलिसांच्या संकेतस्थळामध्ये अमुलाग्र बदल करण्यात येत असून हे संकेतस्थळ नाविन्यपूर्ण सुविधांनी युक्त राहणार असल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली. या नवीन संकेतस्थळावर कोणत्याही नागरिकांना तातडीने माहिती उपलब्ध होण्यासाठी चॅट बॉक्सची सुविधा प्राप्त होणार असून सायबर गुन्हेगारीचे प्रकार नोंदवण्यासाठी तक्रार अर्ज नोंदवण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्याचबरोबरने सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात उपायोजना आखण्यासाठी समग्रप्रणाली (उपाय) उपलब्ध राहणार आहे.


