महाराष्ट्रमुंबई

निपुण ॲपचा ‘अति’उत्साह: तांत्रिक वैगुण्यांमुळे मूळ उद्देशालाच हरताळ

मुंबई : विद्यार्थ्यांच्या क्षमता जोखून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या शिक्षकांपेक्षा ‘अ‍ॅप’वर असलेला शिक्षण विभागाचा भरवसा विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मूल्यमापन करणाऱ्या ‘निपुण अ‍ॅप’मधील मजकुरात असलेल्या व्याकरणाच्या, भाषिक चुकांमुळे उत्तरे योग्य असूनही विद्यार्थी अक्षम ठरत आहेत. वयानुसार कोणत्या भाषिक आणि गणिती कौशल्यांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये व्हावा, हे निश्चित करून शिक्षण विभागाने अध्ययन निष्पत्तीचे निकष काही वर्षांपूर्वी निश्चित केली. त्यानंतर विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित झाली का? याची पडताळणी करण्यासाठी ‘निपुण’ चाचणी घेण्यास सुरुवात केली. यंदापासून ही चाचणी ‘अ‍ॅप’मार्फत घेण्यात यावी, असा आदेश शिक्षण विभागाने दिला. त्यानुसार सध्या पहिली ते पाचवी वर्गाच्या चाचण्या ‘निपुण अ‍ॅप’द्वारे सुरू आहेत. मात्र अ‍ॅपमधील त्रुटींमुळे राज्यातील बहुसंख्य विद्यार्थी कागदोपत्री सक्षम नसल्याचेच दिसण्याची शक्यता आहे. अ‍ॅपमध्येच मजकूर चुकीचा असेल आणि अनुलेखन करताना विद्यार्थ्यांनी तो दुरुस्त करून लिहिला तरीही अ‍ॅप मुलांना चुकीचे ठरवत आहे. मुलांची भाषा-समज, आशयाची अचूकता, सुधारण्याची जाणीव या सगळ्यांपेक्षा अ‍ॅपमधील मजकुराशी तंतोतंत जुळणी महत्त्वाची ठरत आहे.

राज्यात अनेक बोलीभाषा आहेत. त्याअनुषंगाने वाचताना काही शब्दांचे उच्चार, लहेजा यात फरक पडतो. मात्र, उच्चारातील ही भिन्नता या अ‍ॅपवर स्वीकारली जात नाही. त्यामुळे वाचता येत असून, अर्थ कळूनही विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचा निष्कर्ष अ‍ॅपवर दिसतो. अक्षरात जरा बदल झाला, उच्चारात सूक्ष्म फरक पडला की अ‍ॅप थेट नापास ठरवते. आवाजातील चढ-उतारही वेगळे असतील तरी विद्यार्थ्याला त्याचे पूर्ण गुण मिळत नाहीत. लहान वर्गातील विद्यार्थ्यांचे उच्चार पुरेसे स्पष्ट असतातच असे नाही. पहिली-दुसरीतील काही मुले काही अंशी बोबडे बोलतात. मात्र त्यामुळे त्यांना अक्षरओळख झालेली नाही, असा निष्कर्ष काढणे विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे आहे. त्यांच्या आवाजातील चढ-उतार हे अ‍ॅपपेक्षा वेगळे असतील तर अशा विद्यार्थ्याला कमी गुण देणे हेही अनैसर्गिक आहे, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. काही अंशी वाचादोष असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाण्याचा धोका अशा मूल्यांकन प्रक्रियेमुळे निर्माण झाल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे. अ‍ॅपवरील मजकुरात चुका आहेत म्हणून विद्यार्थ्यांना चुकीचे लिहिण्यास सांगणे किंवा वाचन करताना ठराविक ढाचाचे उच्चार, आवाजातील चढ उतार याचा अतिआग्रह हे मुलांचे मूल्यांकन करण्यापेक्षा नुकसान करणारे आहे. मात्र दिलेल्या कालावधीत मूल्यांकनाचे काम अ‍ॅपच्या माध्यमातून करायचे आहे. त्यामुळे यातून पळवाटा शोधून स्वत:च चाचण्या सोडवत असल्याचेही काही शिक्षकांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना अनुलेखनासाठी दिलेल्या मजकुरात व्याकरणाच्या चुका आहेत. उदाहरणार्थ ‘दूध’ हा शब्द एका मजकुरात ‘दुध’ असा लिहिण्यात आला आहे. विद्यार्थ्याने शब्द बरोबर लिहिला तरी अ‍ॅपमधील चुकीच्या शब्दाशी तो जुळत नाही, म्हणून विद्यार्थ्याला चुकीचे ठरवून शून्य गुण दिले जातात. वर्गात चाचणी घेताना पूर्ण शांतता नसल्यास अ‍ॅपवर मुलांनी वाचलेला मजकूर स्वीकारला जात नाही. अगदी लहान मुले पूर्णवेळ चाचणी होईपर्यंत शांत राहात नाहीत. मात्र थोडाही आवाज असल्यास परत परत चाचणी घ्यावी लागते, अशीही शिक्षकांची तक्रार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button