राज्य सरकारचा मोठा निर्णय: ७,८०८ कुटुंबांना हक्काचे घर; घरांच्या चटई क्षेत्रात महत्त्वाची वाढ

पुणे : पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी महापालिकेकडून गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे सहा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ७ हजार ८०८ कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे. वाद न्यायालयात गेल्याने आणि मुदतीमध्ये जागा ताब्यात न आल्याने रावेत येथील गृहप्रकल्प रद्द करण्यात आला होता. तेथील लाभार्थ्यांना किवळेतील खासगी गृहप्रकल्पात सदनिका देण्यात आल्या. प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या रावेत येथील गृहप्रकल्पाचा पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी महापालिकेच्या वतीने ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यांपैकी रावेत, पुनावळे, वडमुखवाडी, मामुर्डी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प असणार आहेत. ताथवडे, चोविसावाडीत बेघरांसाठी (एचडीएच गटासाठी) प्रकल्प असणार आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात पंतप्रधान आवास योजनेत बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली, पिंपरीतील उद्यमनगर आणि आकुर्डीतील मोहननगर येथे गृहप्रकल्प उभारले आहेत. आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांना ३ हजार ६६८ सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या डुडुळगाव येथील गृहप्रकल्पातील १ हजार १९० सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजनेत दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पूर्वी तीन लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा होती. ती आता वाढवून सहा लाख रुपये करण्यात आली आहे. सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेत सदनिका खरेदी करता येतील. तसेच, पूर्वी ३० चौरस मीटर (३२३ चौरस फूट) चटई क्षेत्रफळाच्या (कार्पेट एरिया) सदनिका होत्या. आता क्षेत्रफळ वाढवल्याने ४५ चौरस मीटर (४८४ चौरस फूट) चटई क्षेत्रफळाच्या सदनिका असणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरातील जास्तीत जास्त कुटुंबांना लाभ मिळणार आहे. वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. या योजनेत शहरातील झोपडपट्टीतील पात्र झोपडीधारकांचाही समावेश केल्याने शहरातील हजारो नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. रावेत येथे एक हजार आठ, मामुर्डीत ८००, पुनावळेत एक हजार २००, वडमुखवाडीत एक हजार २००, ताथवडेत दोन हजार ४०० आणि चोविसावाडीत एक हजार २०० अशा सात हजार ८०८ सदनिकांच्या प्रकल्पांसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. जागा ताब्यात येताच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात केली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल यांनी सांगितले.



