गुन्हे

सोनसाखळी चोरांचा कर्दनकाळ! बोळींज पोलिसांनी १०६ गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगारांना केले जेरबंद

विरार : सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात बोळींज पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मुंबई आणि परिसरात तब्बल १०६ गुन्हे दाखल असून, त्यांच्या गुन्हेगारीचा विस्तार पाहता पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली आहे. १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री विरार पश्चिम येथील म्हाडा कॉलनी परिसरात किर्ती कुंदन पाटील (५५) या आपल्या मुलीसह फेरफटका मारत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील ५७ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरीने खेचून नेली होती. या झटापटीत फिर्यादी महिला जखमीही झाली होती. याप्रकरणी बोळिंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बोळींज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला होता. घटनास्थळी मिळालेली माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे तपासातून अतिफ मोबीन अन्सारी ऊर्फ ‘मेंटल’ (४३) आणि साजीद अब्दुल अजीज शेख ऊर्फ ‘बडा साजीद’ या दोघांची नावे समोर आली. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. या अटक आरोपींकडून १२.३०० ग्रॅम वजनाची सोनसाखळी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून मुंबई व उपनगरात या टोळीवर १०६ गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी ओळख लपवण्यासाठी विना क्रमांकाची दुचाकी, हेल्मेट आणि हुडीचा वापर करीत होते असे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपींनी संघटितपणे १४ चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या सराईत गुन्हेगारी वृत्तीची दखल घेत पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात ‘मकोका’ (MCOCA) कलमानुसार ही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी सांगितले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button