वाहनतळाचा तिढा सुटणार; महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

विरार : वसई विरार शहरातील रेल्वे स्थानक परिसरात वाढणारी वाहनांची गर्दी आणि पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. वसई, नायगाव, नालासोपारा आणि विरार या महत्त्वाच्या रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी जागेचा शोध व आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे. वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु अनेक प्रवासी हे स्थानक परिसरात वाहने घेऊन येत असतात. वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. सध्या रेल्वे स्थानकांच्या बाहेर दुचाकी आणि चारचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण होते. तसेच, खाजगी पार्किंगचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसतात. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने स्वतःच्या मोकळ्या भूखंडांवर किंवा रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून वाहनतळ सुविधा देण्याचे नियोजन केले आहे. यात विरार , नालासोपारा, नायगाव आणि वसई या रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळ तयार केले जाणार आहे. नायगाव आणि वसई रेल्वे स्थानक परीसरासाठी वाहनतळ करण्यासाठी जागेचा शोध सुरू केला आहे. तर नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात आरक्षण क्रमांक ३९३ हा वाहनतळासाठी आरक्षित आहे. यात सुमारे ५८०४ चौरस मीटर जागा आहे. मात्र महापालिकेच्या ताब्यात २८५९ चौरस मीटर इतकी जागा उपलब्ध आहे. उर्वरित जागा ही ताब्यात घेऊन वाहनतळ तयार केले जाणार आहे.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे. रेल्वे स्थानक परीसरातील रस्ते मोकळे मोकळे व्हावेत आणि प्रवाशांचा वेळ वाचवा, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे असे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. याशिवाय स्थानक परीसरात फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू केली असेही त्यांनी सांगितले आहे. विरार पूर्व रेल्वे स्थानक परिसरात वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्थानक परिसरात सॅटीस प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पाची आखणी व आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेकडून नामांकित संस्थेची नियुक्ती केली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागून नागरिकांची कोंडीतून मुक्तता होण्यास मदत होणार आहे. नायगाव रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात अधिकृत वाहनतळ नसल्याने प्रवासी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात, ज्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रस्त्यावर वाहने लावल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जात असून, नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. तातडीने नायगाव पश्चिम येथील भागात वाहनतळ उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक आशिष वर्तक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.


