महाराष्ट्रमुंबई

मुंबईत ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ५०० नवीन मिडी बसचा प्रस्ताव; टेकडी व अरुंद रस्त्यांवर पुन्हा सेवा

बेस्टकडून भाड्याच्या बसऐवजी स्वतःच्या सीएनजी बस खरेदीची तयारी

मुंबई : शहरातील अंतर्गत प्रवासासाठी टॅक्सीबरोबरच मोठ्या प्रमाणावर बससेवेचा वापर करणाऱ्या मुंबईकरांसाठी बेस्ट प्रशासन लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल ५०० नवीन मिडी बस खरेदी करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. विशेषतः मेट्रो आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात, तसेच अरुंद रस्ते आणि टेकड्यांच्या भागात सहजपणे सेवा देता यावी यासाठी या बसचा वापर करण्यात येणार आहे. सध्या बेस्टकडे अनेक मिडी बस भाडेतत्त्वावर आहेत; मात्र त्यांच्या देखभालीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने भाड्याच्या बसऐवजी स्वतःच्या मालकीच्या बस घेण्याचा विचार जोर धरत आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी यावर सविस्तर चर्चा करून या निर्णयाला पाठिंबा दर्शवला.

या प्रस्तावानुसार नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या सर्व बस सुमारे नऊ मीटर लांबीच्या असून त्या सीएनजीवर चालणार आहेत. प्रत्येक बसमध्ये चालकासोबत वाहकाचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. यापूर्वी विक्रोळी, भांडुप आणि पवईसारख्या टेकडी भागांमध्ये मिडी बस सेवा सुरू होती; मात्र बस जुनी झाल्यामुळे ती सेवा बंद करण्यात आली होती. आता वाढती लोकसंख्या आणि प्रवासाची गरज लक्षात घेता या भागात पुन्हा सेवा सुरू करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. सध्या मेट्रो आणि रेल्वे स्थानकांजवळ ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी सुमारे ३१५ मिडी बसांची गरज असल्याचे मानले जात आहे. सुरुवातीला २०० बस खरेदीचा प्रस्ताव होता, पण तो पुढे गेला नव्हता. आता वाढत्या मागणीमुळे हा आकडा थेट ५०० बसांपर्यंत वाढवण्यात आला असून, लवकरच हा प्रस्ताव राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button