गुन्हेमहाराष्ट्र

‘गोल्ड फ्लेक’ नावाने डुप्लिकेट सिगारेटची विक्री; चार जणांविरुद्ध कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा

बारामतीत बनावट सिगारेट रॅकेटचा पर्दाफाश; ११.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, मुंबई कनेक्शन उघड

पुणे : बारामती शहर परिसरात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सिगारेटची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. श्रीराम नगर परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ३२ हजार रुपये किमतीचा बनावट ‘गोल्ड फ्लेक’ सिगारेटचा साठा आणि टाटा कॅरी पिकअप टेम्पो जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध कॉपीराईट अधिनियम, १९५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘अन्वेष आयपीआर सर्व्हिसेस’चे डेप्युटी मॅनेजर योगेश वेदानंदसिंग तोमर यांच्या फिर्यादीवरून हुजेब फिरोज बागवान (रा. यादगार सिटी, हरीकृपानगर, बारामती), रयान अयुब खान (रा. हरीकृपानगर, इंदापूर रोड, बारामती), जाकीर अल्लाउद्दीन शेख (रा. अंधेरी, मुंबई) आणि पप्पू निषाद (रा. महादेव मळा, बारामती) यांच्याविरुद्ध कॉपीराईट अधिनियम १९५७ च्या कलम ५१ व ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्रीराम नगर परिसरात टाटा कॅरी पिकअप (क्र. एमएच ४२ ए.क्यू. ६६१७) मधून बनावट सिगारेटची वाहतूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती बारामती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदार व पंचांच्या उपस्थितीत छापा टाकून वाहन ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान वाहनातून ‘गोल्ड फ्लेक’ ब्रँडच्या नावाने बनावट सिगारेटचे बॉक्स आढळले. त्यामध्ये २ लाख ४० हजार ३ रुपये किमतीचे ‘गोल्ड फ्लेक रेड’चे ५० बॉक्स, ४ लाख ४२ हजार रुपये किमतीचे ‘गोल्ड लाईट’चे १३० बॉक्स आणि ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा टाटा कॅरी पिकअप असा एकूण ११ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक हुजेब बागवान याच्याकडे चौकशी केली असता, हा माल रयान अयुब खान व जाकीर अल्लाउद्दीन शेख यांच्याकडून मिळाल्याचे तसेच पप्पू निषाद यांच्या टेम्पोतून आणल्याची माहिती समोर आली. तपासात हा बनावट माल मुंबईतील अंधेरी येथून पुरविला जात असल्याचे उघड झाले आहे.

ही कारवाई बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस हवालदार साबळे व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार यशवंत ज्ञानदेव पवार करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button