नरिमन पॉइंटवरून थेट मुंबई–दिल्ली महामार्गावर जाण्याचा मार्ग मोकळा
उत्तन–विरार सागरी सेतूच्या जोडणीला केंद्राची तत्त्वतः मंजुरी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) महत्त्वाकांक्षी उत्तन–विरार सागरी सेतू प्रकल्पाला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पातील मुंबई–दिल्ली द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या १८.९५ किमी लांबीच्या विरार जोडरस्त्यावरील इंटरचेंजच्या बांधकामाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे सागरी सेतूला मुंबई–दिल्ली द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला असून भविष्यात नरिमन पॉइंटवरून थेट मुंबई–दिल्ली महामार्गावर काही मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. एमएमआरडीएच्या ५५.१२ किमी लांबीच्या उत्तन–विरार सागरी सेतू प्रकल्पात २४.३५ किमीचा मुख्य सागरी सेतू आणि ३०.७७ किमीचे तीन जोडरस्ते (कनेक्टर) प्रस्तावित आहेत. यामध्ये उत्तन जोडरस्ता (९.३२ किमी), वसई जोडरस्ता (२.५० किमी) आणि विरार जोडरस्ता (१८.९५ किमी) यांचा समावेश आहे. या तीनही जोडरस्त्यांवर एकूण सहा इंटरचेंज उभारण्यात येणार असून, विरार जोडरस्त्यावरील सहावी इंटरचेंज थेट मुंबई–दिल्ली द्रुतगती महामार्गाशी जोडली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) सुमारे १,३५० किमी लांबीचा मुंबई–दिल्ली द्रुतगती महामार्ग विकसित करत आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई–दिल्ली प्रवासाचा कालावधी सुमारे १२ ते १३ तासांपर्यंत कमी होणार आहे. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांतील वाहनचालकांना या महामार्गावर थेट प्रवेश मिळावा, यासाठी एमएमआरडीएने उत्तन–विरार सागरी सेतूमार्फत जोडणीची योजना तयार केली आहे.
या जोडणीसाठी विरार जोडरस्ता आणि इंटरचेंजच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची मंजुरी आवश्यक होती. यासाठी एमएमआरडीए २०२३ पासून सातत्याने पाठपुरावा करत होती. अखेर गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून, आता अंतिम मंजुरीची प्रतीक्षा असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. दरम्यान, उत्तन–विरार सागरी सेतूच्या प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नसली तरी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगरातील वाहतुकीचे चित्र बदलणार आहे. नरिमन पॉइंट, सागरी किनारा मार्ग, वांद्रे–वरळी सागरी सेतू, वांद्रे–वर्सोवा सागरी सेतू, वर्सोवा–भाईंदर किनारा मार्ग आणि पुढे उत्तन–विरार सागरी सेतू मार्गे वाहनांना थेट मुंबई–दिल्ली द्रुतगती महामार्गावर जाता येणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईपासून विरारपर्यंतचा प्रवास अधिक जलद होण्याबरोबरच दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही मोठा वेळ वाचणार असून, भविष्यात हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.



