महाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कॅन्टीनवर FDAचा दणका; विनापरवाना उपहारगृह सील

पालघर : जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहावर मागील आठवड्यात झालेल्या कारवाईनंतर आता पालघर येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील विनापरवाना व अस्वच्छ कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या कॅन्टीनचा अन्न व्यवसाय तात्काळ बंद करून उपहारगृह सील करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ३० जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील कॅन्टीनची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित कॅन्टीनकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला वैध FSSAI परवाना अथवा नोंदणी नसल्याचे उघड झाले. तसेच स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि आरोग्यविषयक परिस्थितीही अत्यंत असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या निकषांचे उल्लंघन आणि वैध परवान्याविना अन्न व्यवसाय सुरू ठेवणे ही अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली असून, आवश्यक वैध परवाना प्राप्त करून स्वच्छतेसंबंधी सर्व त्रुटी दूर केल्याशिवाय संबंधित कॅन्टीन पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानंतर थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कॅन्टीनवर झालेल्या या कारवाईमुळे पालघरमधील अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एफडीएने जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायिकांना वैध FSSAI परवाना किंवा नोंदणी करून घेण्याचे तसेच अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागाने दिला आहे. दरम्यान, प्रशासकीय कार्यालयांतील उपहारगृहांवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष लक्ष असून, गुरुवारी जिल्हा परिषद येथील उपहारगृहाचीही तपासणी करण्यात आली. या उपहारगृहाकडे वैध परवाना असल्याचे तसेच स्वच्छता समाधानकारक आढळल्याने काही किरकोळ सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

“अन्न सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत शासन कोणतीही तडजोड करणार नाही. विनापरवाना अन्न व्यवसाय तसेच स्वच्छता व अन्न सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील.”- प्रवीण सूर्यवंशी, सहायक आयुक्त (अन्न), पालघर परिमंडळ-१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button