‘फक्त चविष्ट नव्हे, तर सुरक्षित अन्नाची मागणी करा’; तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना आवाहन

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळविरोधी कारवायांना वेग देणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना सुरक्षित अन्नाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. अन्नसुरक्षा ही आस्थापनाच्या आकारावर अवलंबून नसून पंचतारांकित हॉटेल असो किंवा रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेता, सर्वांसाठी नियम समान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुंढे म्हणाले की, २०११ पूर्वी अन्नातील भेसळ रोखण्यावर अधिक भर दिला जात होता. मात्र, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट, २००६ लागू झाल्यानंतर अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. या बदलानुसार अन्न व्यवसायिक, नियामक संस्था आणि ग्राहक या तिन्ही स्तरांवर कार्यपद्धतीत बदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. खाद्यपदार्थ उत्पादक, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करणारे उद्योग तसेच ग्राहक या सर्वांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी नियामक संस्थांवरही गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी असल्याचे नमूद केले.
अन्नसुरक्षेचा संबंध एखाद्या हॉटेलच्या किंवा आस्थापनाच्या आकाराशी नसतो. पंचतारांकित हॉटेल असो किंवा रस्त्यावरील विक्रेता, सर्वांसाठी नियम समान आहेत. त्या नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी एफडीए पार पाडत असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले. ग्राहकांनी केवळ चविष्ट अन्नाची मागणी न करता ते सुरक्षित आहे का, यालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन करत त्यांनी सुरक्षित अन्नाची संस्कृती विकसित झाल्यास निरोगी भारत घडविण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कारवायांचा धडाका सुरू ठेवला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.



