मराठी भाषेच्या धड्यांसाठी अमराठी रिक्षाचालकांचा पुढाकार
वसई-विरारमध्ये ७ हजार चालकांची तोंडी परीक्षा

विरार : रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी देण्यात आलेल्या १५ ऑगस्टच्या अंतिम मुदतीला अवघे पंधरा दिवस शिल्लक राहिल्याने अमराठी रिक्षाचालकांचा मराठी शिकवणी वर्गांकडे मोठा ओढा वाढला आहे. गेल्या दोन महिन्यांत वसई-विरार परिसरातील सात हजारांहून अधिक रिक्षाचालकांनी प्रशिक्षण पूर्ण करून तोंडी परीक्षा दिली असून वाढत्या प्रतिसादामुळे प्रशिक्षण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असूनही मराठीत संवाद न साधणाऱ्या अमराठी रिक्षाचालकांचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर राज्य शासनाने त्यांना मराठीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. यासाठी १५ ऑगस्ट ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून १ जूनपासून परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर मराठी भाषा अभ्यास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये रिक्षाचालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद कसा साधावा, याचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक चालकासाठी चार तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
वसई-विरार शहरात परराज्यातून वाढलेल्या स्थलांतरामुळे अमराठी रिक्षाचालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव परिसरातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये चालकांना मराठीचे धडे दिले जात आहेत. अंतिम मुदत जवळ आल्याने विशेषतः जुलैच्या उत्तरार्धात प्रशिक्षणासाठी येणाऱ्या चालकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. सुरुवातीला वसई-विरारमध्ये नऊ प्रशिक्षण केंद्रांद्वारे हे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र वाढता प्रतिसाद आणि कमी उरलेला कालावधी लक्षात घेऊन गोंसालो गार्सिया महाविद्यालयासह अन्य ठिकाणी अतिरिक्त प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच प्रशिक्षणाचा सात दिवसांचा कालावधी कमी करून दोन ते तीन दिवसांपर्यंत आणण्यात आल्याची माहिती या उपक्रमाच्या पालघर जिल्हा समन्वयक सीमा पाटील यांनी दिली. परवाना रद्द होण्याच्या भीतीने मोठ्या संख्येने रिक्षाचालकांनी मराठी शिकण्यास सुरुवात केली असून, गेल्या दोन महिन्यांत सात हजारांहून अधिक चालकांनी प्रशिक्षण पूर्ण करून तोंडी परीक्षा दिल्याची माहिती प्रशिक्षकांनी दिली आहे.



