उड्डाणपुलांमधील त्रुटीं मुळे प्रकल्पांच्या निगराणीसाठी २९ तज्ज्ञ कंपन्यांची नियुक्ती

मुंबई : गोखले पुलाचे एकमेकांशी न जुळलेले भाग, मृणालताई गोरे उड्डाणपुलावरील खडबडीत रस्ता आणि विक्रोळी रेल्वे पुलाच्या नियोजनातील त्रुटी अशा सलग घडलेल्या तांत्रिक चुका व त्यावर झालेल्या तीव्र टीकेनंतर मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील पूल, उड्डाणपूल आणि बोगदा प्रकल्पांमध्ये आराखड्यातील त्रुटी व नियोजनातील निष्काळजीपणा टाळण्यासाठी २९ तांत्रिक सल्लागारांचे पाच वर्षांसाठी पॅनेल नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावावर सत्ताधारी आणि विरोधक प्रशासनाला घेरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबईतील अनेक महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांतील त्रुटींमुळे महापालिकेवर सर्व स्तरांतून टीका झाली होती. नुकत्याच वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलावरील अयोग्य पृष्ठभागामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तसेच विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर मध्यभागी पादचाऱ्यांसाठी आवश्यक जागाच नसल्याचे समोर आले होते. यापूर्वी फेब्रुवारी २०२४ मध्ये अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या पुनर्बांधणीदरम्यान पुलाचे दोन भाग एकमेकांशी न जुळल्याने महापालिकेच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी सल्लागारांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने दंडात्मक तरतुदींचाही समावेश केला आहे. बहुतांश प्रकल्पांसाठी सल्लागारांचे मानधन कमाल ३.५ कोटी रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आले असून केबल-स्टेड आणि सस्पेंशनसारख्या जटिल पुलांना या मर्यादेतून वगळण्यात आले आहे.
तसेच, सल्लागारांच्या आराखड्यातील त्रुटींमुळे प्रकल्पाचा खर्च १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्यास संबंधित सल्लागाराच्या शुल्कातून १० टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार आहे. या कठोर अटींमुळे भविष्यात मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा दर्जा आणि नियोजन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या पॅनेलसाठी मुख्य अभियंता (पूल) विभागाकडे एकूण ३१ कंपन्यांनी अर्ज केले होते. तांत्रिक क्षमता आणि अनुभवाच्या आधारे त्यापैकी २९ कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या यादीत टाटा कन्सल्टन्सी इंजिनिअर्स, स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट्स आणि ग्रीन डिझाइन अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांसारख्या नामांकित संस्थांचा समावेश आहे. हे तांत्रिक सल्लागार प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी संभाव्य अडचणींचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचवणार आहेत.



