क्रिडाविश्व

भारतीय संघात फिरकी गोलंदाजी खेळण्याचे तंत्रच झाले आहे गायब

भारतीय संघ एकेकाळी फिरकी गोलंदाजी खेळण्यात मास्टर होता. आपल्याकडे तर फिरकी गोलंदाजांच्या कित्येक पिढ्या झाल्या. त्यामुळे कोणताही परदेशी संघ भारतात आला किंवा भारतीय संघ परदेशात गेला की आपले फिरकी गोलंदाजच वर्चस्व राखायचे.

आता मात्र, आपणच परदेशी फिरकी गोलंदाजांसमोर नाचताना दिसतो.

भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या नवोदित टॉड मर्फी याच्या फिरकी गोलंदाजीवर ज्या पद्धतीने आपल्या विकेट गमावल्या त्या पाहता आता आपल्यालाच फिरकी गोलंदाजी कशी खेळायची याचे धडे गिरवण्याची अगरज असल्याचे दिसते.

मुळातच आता केवळ इंग्लंड व ऑस्ट्रेलिया वगळता कसोटी सामने खेळण्याची तयारी भारतीय संघासह अनेक संघांची दिसत नाही. एकदिवसीय सामनेही जीथे जीवावर अल्यासारखे खेळले जातात तीथे कसोटी सामन्यांची काय कथा. सध्या जमाना फास्टफुडचा आहे, त्यामुळे टी-२० क्रिकेट खेळण्यातच धन्यता मानली जाते.

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज या पहिल्या कसोटीत ज्या पद्धतीने रवीचंद्रन अश्‍विन व रवींद्र जडेजा याच्या गोलंदाजीसमोर साफ अपयशी ठरले तेच चित्र मर्फीच्या गोलंदाजीवर भारतीय संघातील फलंदाजांच्या बाबतीत दिसून आले. लोकेश राहुल, रवीचंद्रन अश्‍विन, चेतेश्‍वर पुजारा व विराट कोहली यांना मर्फिने ज्या चेंडूंवर बाद केले ते काही शतकातील सर्वोत्तम ठरतील असे चेंडू मुळीच नव्हते मात्र, आपल्या या दिग्गज फलंदाजांचे फुटवर्क अत्यंत तकलादू ठरले. त्यांचे पाय चेंडूच्या टप्प्यावर येत नव्हते तर डोकेही चेंडूवर येत नव्हते मग कव्हर्स, मिड ऑन, स्वीप, स्टीअर हे फटके असतात व ते वापरायचेही असतात हेच आपल्या फलंदाजांना माहितच नसल्यासारखे ते बाद झाले.

त्यातही पुजाराने फलंदाजीचा गिअर अचानक का बदलला हे देखील अद्याप उमगलेले नाही. त्याचे तंत्र भक्‍कम आहे, फुटवर्क चांगले असते मग घाई करण्याची गरज काय होती. त्याने १०० चेंडू खेळून १० धावा केल्या असत्या तरीही त्याला कोणी काहीही बोलले नसते कारण त्याची ख्यातीच संथ फलंदाजीची आहे.

राहुल संघात परतला असला तरीही गोंधळलेलाच वाटला. चेंडू सोडायचा की फटकवायचा हेच त्याला समजत नव्हते. अश्‍विनचे सोडा तो नाइट वॉचमन म्हमून आला होता फलंदाजीला त्याच्याकडून काय अपेक्षा करणार परंतु जगातील सर्वात प्रमुख फलंदाज असलेल्या कोहलीलाही आता नेटमध्ये आपले तंत्र पुन्हा एकदा घोटावे लागणार आहे.

आपल्या ज्या महान फिरकी गोलंदाजांनी जगावर राज्य केले तसेच गोलंदाज आज अन्य संघात आहेत व त्यांच्या अत्यंत सुमार फिरकीसमोर आपले फलंदाज ज्या पद्धतीने बाद होताना दिसतात ते पाहता आता तंत्र पुन्हा एकदा शिकण्याची गरज असल्याचे सहज कळून येते. ज्या गोलंदाजीवर विक्रमादित्य सुनील गावसकर किंवा राहुल द्रविड यांनी दोन-दोन दिवस फलंदाजी केली त्यावर कोहलीसह सर्व प्रमुख फलंदाज एकेरी धाव घ्यायलाही कचरत होते याला काय बोलावे. तंत्रात सुधारणा झाली तरच अन्यथा आपल्याच फलंदाजांना अन्य देशांचे फिरकी गोलंदाज गिऱ्हाईक बनवल्याशिवाय राहणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button