मनोरंजन 

‘मसुटा’ सामाजिक चित्रपट मनाला भिडणारी कथा; या दिवशी होणार प्रदर्शित

लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या उद्देशाने आतापर्यंत अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्येच आता लवकरच मसुटा हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. समाजाला आरसा दाखवणारा आणि भावनिक नात्याची गोष्ट सांगणारा ‘मसुटा’ या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून अनेकांना चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

ज मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील निरनिराळ्या धाटणीचे चित्रपट बनत आहेत. असाच एक वेगळ्या वाटेनं जाणारा ‘मसुटा’ असं शीर्षक असलेला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामाजिक मनोरंजक सिनेमाच्या व्याख्येत अचूक बसणारा ‘मसुटा’ हा चित्रपट २४ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठी रसिकांसमोर एक आगळी वेगळी कथा येणार आहे.

काशिबाई फिल्म्स प्रोडक्शन आणि साईसागर प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘मसुटा’ या चित्रपटाची निर्मिती भरत मोरे आणि मनेश लोढा यांनी केली आहे. अजित देवळे आणि सुनील शिंदे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर्स आहेत. अजित देवळे यांनीच ‘मसुटा’चं दिग्दर्शन आणि संकलनही केलं आहे. ‘मसुटा’ हा चित्रपट म्हणजे जगण्यासाठी धडपड करणारी जगावेगळी कर्मकहाणी आहे. यात समाजातील एका विशिष्ट वर्गातील मनाला भिडणारी कथा पहायला मिळेल. या चित्रपटाच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेशही देण्यात आले आहेत. दिग्दर्शक अजित देवळे यांनी हे सर्व आपल्या अनोख्या दिग्दर्शनशैलीद्वारे मनोरंजक करण्याचं काम केलं आहे. या चित्रपटानं आजवर देश-विदेशांतील बऱ्याच सिने महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

आपला देश हा विविधतेने नटलेला तसेच सामाजिक बांधिलकी जपणारा असला तरीही काही खेड्यापाड्यात अनिष्ट रूढी, प्रथा आणि जातीभेद हा आज सुद्धा पाळला जातो. यावरच आधारित तसेच शिक्षणासाठी झटणाऱ्या एका कुटुंबाची गोष्ट ‘मसुटा’ आपल्या समोर आणत आहे. आपल्या समाजात मृत्यूनंतर अंत्यविधी करणं हे फारच महत्त्वाचं समजलं जातं असलं तरी ते अंत्यविधी करणारा समाज मात्र अनेकांना गरजेचा वाटत नाही. गावाखेड्यांमधील शाळा आजही असे काम करणाऱ्या कुटुंबातील मुलांना तेथे शिक्षण घेऊ देत नाही. या कुटुंबातील मुलींसोबत कोणीही गावातील व्यक्ती लग्न करत नाही. आजही ही कुटुंबे कोणत्याही सरकारी लाभ, योजना व सुविधांसाठी अपात्र मानली जातात. परिस्थिती आणि गाव त्यांच्या विरोधात जाऊन आपल्या मुलाला शिकवण्याची इच्छा असलेल्या बापाची आणि त्याच्या कुटुंबाच्या व्यथेची गोष्ट ‘मसुटा’ मधून आपल्या समोर येणार आहे.

‘मसुटा’चं पटकथा लेखन भरत मोरे यांनी केलं असून, अनिल राऊत यांनी संवाद लिहिले आहेत. अनंत जोग, नागेश भोसले, हृदयनाथ राणे, रियाझ मुलाणी, अर्चना महादेव, वैशाली केंडाळे, कांचन पगारे, यश मोरे आदी कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. गीतरचना आणि संगीत अविनाश पाटील व सुनील म्हात्रे यांचं आहे. आदर्श शिंदे, अबोली गिऱ्हे, अविनाश पाटील यांनी या चित्रपटासाठी गायन केलं असून कॉस्च्युम डिझाईन चैत्राली डोंगरे यांनी केलं आहे. डिओपी दिलशाद व्ही. ए. यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, पार्श्वसंगीत पिनाकी रॉय यांनी केलं आहे. बॉक्स हिट मूव्हीज या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button