प्रतिबंधात्मक कारवाईमुळे पुण्यात कोयताधारी आले वठणीवर

पुणे गुन्हे वार्ता : पुणे शहर परिसरात कोयताधारी आरोपींनी धुडगूस घातल्यानंतर पोलिसांनी कठोर पाऊले उचलत प्रतिबंधक कारवाईवर भर दिला आहे. पोलिसांनी चालू वर्षात तब्बल ५ हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून शेकडो आरोपी आणि कोयते जप्त केले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना कोयताधारी वठणीवर आल्याचे चित्र शहरात आहे.
विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, माहिती तंत्रज्ञान हब अशी विविध नावांची बिरुदावली मिरविणार्या पुणे शहराचा सर्व क्षेत्रात झपाट्याने विकास होता असतानाच, वाढती गुन्हेगारी शांत पुण्याला आता अशांत करू पाहते आहे. गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या फायरिंग आणि कोयत्याने मारहाणीच्या घटनांमुळे पुण्याचे नाव राज्यभर गाजले. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याने विधानसभेत शहरातील कोयता गँगचा मुद्दा उचलल्याने शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला. हडपसर, फुरसुंगी सह इतर काही भागांत कोयता गँगने धुमाकूळ घातल्याने पुणे पोलिसांनीदेखील कठोर पावले उचलत धडक कारवाईला सुरुवात केली. कोयत्याने मारहाणीच्या घटना घडलेल्या ठिकाणी मोर्चा काढून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना तयार केली, तर कोयता गँगचे वर्चस्व असलेल्या हडपसर भागातील सराईत गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करून गुन्हेगारांना इशारा दिला. उपनगरातील कोयत्याचे लोन थेट शहराच्या मध्यवस्तीपर्यंत पोहचले होते. एवढेच नाही तर एका शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केला होता. या सर्व घटनांना गांभीर्याने घेत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सराईत गुन्हेगार, त्याच बरोबर नव्याने उदयास येणारे कथित भाई यांची कुंडली तयार केली. यानंतर गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला. यंदा चालू वर्षात पोलिसांनी ५ हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, तर गुन्हेगारी वाटेवर चालू पाहणा़र्या, गुन्हेगारी कृत्यात सहभागी असलेल्या अल्वलीयन मुलांवर कारवाईचा बडगा उगारून समुपदेशन केले आहे. एवढेच नाही तर अवैध कोयते विक्री करणार्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास मदत झाली.
कोयता खरेदीसाठी आधार कार्ड
शहरात कोयता खरेदी करण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तणा पाटील यांनी दिले आहे. कोयता विक्री करणाऱ्याकडील आधार देखील तपासले जात आहे. त्याचे काही सकारात्मक परिणाम शहरात दिसू लागले असून, कोयत्याने होणारे गुन्हे कमी झाल्याचे दिसून येते आहे.
पुणे पोलीस परिमंडळ प्रतिबंधात्मक कारवाई
परिमंडळ एक : ४५०
परिमंडळ दोन : ६००
परिमंडळ तीन : ११००
परिमंडळ चार : १२०९
परिमंडळ पाच : १४००



