महाराष्ट्र

पश्चिम रेल्वे लोकल प्रवाशांना देणार सुखद धक्का; सहावी मार्गिका होणार लवकरच उपलब्ध 

पश्चिम रेल्वेवरील ‘मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गिके’च्या तब्बल १४ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना आता खार ते बोरिवली अशी सहावी मार्गिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मुंबई सेंट्रल आणि खारमधील अडथळ्यांमुळे हा मार्ग तूर्त ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

मुंबई सेंट्रल ते खारदरम्यान अतिरिक्त मार्गिका उभारण्यासाठी सात यार्डांमध्ये तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. त्याचबरोबर हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीचा पूल अडथळा ठरत आहे. हा पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. यामुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वे वाहतूक अधिक कालावधीसाठी विस्कळीत होण्याची भीती आहे. यामुळे खार ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचा आराखडा मंजूर करून त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. खार ते बोरिवली दरम्यान रेल्वे रुळांलगत मोठ्या संख्येने अतिक्रमणे आहेत. सर्वेक्षणाअंती अधिकृत ६०७ प्रकल्पबाधित निश्चित करण्यात आले असून, त्यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमाने पर्यायी घरे देण्यात आली आहेत. यापैकी २६० कुटुंबीय पर्यायी घरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. उर्वरित प्रकल्पबाधितांना घरांचे वाटप करण्यात आले आहे.

खार ते गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम ८० टक्के झाले असून, जूनअखेर हे काम पूर्ण होईल. गोरेगाव ते बोरिवलीचे काम वेगाने सुरू आहे. मार्च, २०२४ पर्यंत खार ते बोरिवली हा संपूर्ण सहावा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button