देशविदेश

पाकिस्तानात मशिदीत झालेल्या स्फोटात; मृतांचा आकडा ८३ तर १५० हून अधिक जखमी

     पाकिस्तानामधील खैबर पख्तूनख्वा प्रांताची राजधानी पेशावर येथे 30 जानेवारी रोजी पोलीस लाइनच्या मशिदीत झालेल्या जोरदार स्फोटातील मृतांचा आकडा 83 वर गेला आहे. मशिदीच्या इमारतीला देखील यामुळे नुकसान झाले आहे. या स्फोटात १५० हून अधिक जखमी झाले होते त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतातील बहुतांश जण हे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी होते जे मशिदीत दुपारच्या नमाज पठणासाठी आले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे की पाकिस्तानी जनतेचं रक्षण करणाऱ्यांनाच कट्टरवाद्यांनी आपले लक्ष्य बनवून दहशतीचे वातावरण तयार केले आहे. सुरुवातीला तालिबानच्या एका कमांडरने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती पण नंतर तालिबानने ही जबाबदारी झटकली.

काल स्फोट झाल्यानंतर अनेकांना पेशावरच्या लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा या रुग्णालयाचे प्रवक्ते डॉ. आझम यांनी सांगितले होते की मृतांमध्ये पोलिसांचाही समावेश आहे.

लेडी रीडिंग रुग्णालयाची अवस्था पाहता आणीबाणी लागू करण्यात आल्याचं डॉ.आझम यांनी सांगितलं.

पेशावर बॉम्बस्फोटावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं की, “पेशावर पोलिस लाईन्सच्या मशिदीत झालेल्या स्फोटाचा मी तीव्र निषेध करतो. पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो.

“आम्ही आमची गुप्तहेर यंत्रणा सुधारणं आणि दहशतवादाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आमच्या पोलिसांना पुरेशा शस्त्रांनी सुसज्ज करणे अत्यावश्यक आहे.” पेशावरमधील स्फोटानंतर इस्लामाबादच्या आयजींनी हाय अलर्ट जारी केला होता.

महत्त्वाच्या इमारती आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर स्नायपर तैनात करण्यात आले. नागरिकांनी घराबाहेर पडताना आपली महत्त्वाची कागदपत्रं सोबत ठेवावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेलवर येणाऱ्या फोटोंमध्ये अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचताना दिसत आहेत. तसंच घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त दिसत आहे.

नेमका किती मोठा होता स्फोट?

पोलिसांनुसार स्फोट इतका मोठा होता की मशिदीचा एक भाग पूर्णपणे उद्ध्व्स्त झाला. समोर असलेल्या कॅंटीनच्या इमारतीचे देखील नुकसान झाले. या भागात पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय आणि त्यांची निवासस्थानं आहेत. पोलीस लाइनच्या पाठीमागे पेशावर सेंट्रल जेल देखील आहे. हा भाग अत्यंत हाय सेक्युरिटी झोन मानला जातो, या भागात येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी केली जाते तसेच जागोजागी नाकेबंदी देखील असते तरी देखील हा हल्ला झाला.

खैबर पख्तूनख्वा प्रांतातील जमात-ए- इस्लामीचे माजी खासदार इनायतुल्ला खान स्फोटाच्या वेळी पोलीस लाइनमध्ये उपस्थित होते. ते सांगतात की जेव्हा स्फोट झाला तेव्हा मी सिटी पोलीसच्या कार्यालयातच होतो. हा स्फोट इतका भयानक होता की कार्यालयाच्या भिंतीदेखील हादरल्या. ते पुढे सांगतात तेव्हा त्यावेळी पोलीस ऑफिसर एजाज खान देखील कार्यालयात होते. स्फोटचा आवाज ऐकून ते घटनास्थळी गेले आणि त्यांच्यासोबत मी देखील गेलो. इनायतुल्ला पुढे सांगतात की जेव्हा मी तिथे पोहचलो तेव्हा गोंधळ उडालेला होता. मशिदीचा एक भाग पूर्णपणे कोसळला होता, लोक ओरडत होते आणि अनेक जण जखमी झाले होते.

इनायतुल्ला हे त्यावेळी मशिदीत असलेल्या लोकांशी बोलले त्यांनी सांगतिलं की नमाजावेळी अनेकजण उपस्थित होते आणि पहिल्या रांगेत असलेले लोक यामुळे प्रभावित झाले. तिथे काही लोक पोहोचले आणि सांगू लागले की आमचे नातेवाईक-मित्र हे ढिगाऱ्याखाली असतील त्यांना वाचवा, असं इनायतुल्ला सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button