महाराष्ट्र

महामुंबईत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी महानगरपालिका करतेय उपाययोजना

मुंबई :  मुंबईत सध्या मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांतून उडणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. शिवाय कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे प्रदूषणही वाढत आहे. याची गंभीर दखल घेत पालिकेने धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी यांत्रिकी इलेक्ट्रिक झाडू, वाहतूक चौकात पाणी फवारणे, हवा शुद्धीकरणासाठी २०० यंत्रे आणि पाच चेकनाक्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

रस्त्यावरील धूळ हटवून स्वच्छता करण्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे २७ यांत्रिकी झाडू आहेत. यांच्या माध्यमातून दररोज सुमारे २९३ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता केली जाते. याच धर्तीवर आता नवीन ९ इलेक्ट्रिक झाडू विकत घेण्यात येणार आहेत. प्रत्येक इलेक्ट्रिक झाडूद्वारे दररोज २८ किलोमीटर याप्रमाणे एकूण २५२ किलोमीटरहून जास्त रस्त्यांची स्वच्छता करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांवर व वाहतूक चौकात पाणी फवारणी करून स्वच्छता करू शकणारे ५० संयंत्र तर सूक्ष्म पद्धतीने पाणी फवारणी करणारे ५० संयंत्र असे एकूण १०० वाहनांवरील १०० संयंत्र खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हवा शुद्धीकरण करणारी वाहनावरील सुमारे २०० संयंत्रे खरेदी करण्याची कार्यवाही देखील सुरू आहे.

हवेतील धुळीला अटकाव करण्यासाठी कलानगर, मानखुर्द, हाजी अली, दहिसर आणि मुलुंड चेक नाका या पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारली जाणार असून त्याबाबतची कार्यवाहीदेखील प्रगतीपथावर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहने धोरण २०२१ नुसार पालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वापरासाठी ३५ इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत विविध प्राधिकरणामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आतापर्यंत ४८६ चार्जिंग स्टेशन उभारली गेली आहेत. पालिकेच्या वतीने आणखी २५ ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग सुविधा उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रम अंतर्गत सुमारे २१०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर बसेस तर ९०० डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची कार्यवाही सुरू आहे. सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण होईल.

मुंबई महानगराचे भौगोलिक वैशिष्टय़ आणि गरज लक्षात घेता मुंबई महानगरासाठी महानगरपालिका प्रशासनाची स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) असणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या नियमांच्या अधीन धूळीचे प्रमाण रोखण्यासाठी काम करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला डॉ. संजीव कुमार यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button