राजकारण
माहीमच्या मजारीवरून राज ठाकरेंच्या अल्टमिटेमनंतर पोलीस ऍक्शनमध्ये

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढी पाडवा मेळाव्यातल्या भाषणात खळबळजनक व्हिडिओ दाखवले. मुंबईतल्या माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर अनधिकृतपणे मजार बांधली गेल्याचा व्हिडिओ राज ठाकरे यांनी दाखवला, तसंच या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही, तर त्या मजारीसमोरच गणपतीचं मंदिर उभारू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. माहिम दर्गाच्या परिसरात समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी भाषणात केला, त्यानंतर आता पोलीस या जागेची पाहणी करून पडताळणी करणार आहेत. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी पडताळणी करणार आहेत. दरम्यान या भागातले आमदार सदा सरवणकर हेदेखील तिकडे जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती आहे.
ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रांतात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस दोघांकडून जागा पडताळली जाणार आहे. जर तथ्य असेल आणि अनधिकृत बांधकाम असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.



