उद्धव ठाकरें यांची मालेगावात जाहीर सभा

उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावात जाहीर सभा होणार आहे. मालेगावमधील कॉलेज मैदानावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही सभा सुरू होईल. कोकणातील खेड येथे पार पडलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यानंतर मुंबईत झालेल्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव यांच्यावर टीका केली. त्यामुळे राज यांच्या टीकेला मालेगावच्या सभेत उत्तर मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे प्रथमच मालेगावात येत आहेत. शिवसेना उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे यांनी मालेगावात सभा घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे उद्धव गटाकडून सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. तर उद्धव यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे उद्धव यांच्या स्वागताचे उर्दू भाषेत बॅनर झळकले आहेत. या उर्दू भाषेतील बॅनरवर जनाब उद्धव ठाकरे असा उल्लेख करण्यात आला असून हे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सभेच्या तयारीसाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, विनायक राऊत शुक्रवारीच मालेगावात दाखल झाले. शनिवारी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी, राऊतांनी शिवसेनेवर टीका केली. शिंदेंनी स्वबळावर 5 आमदार निवडून दाखवावेत, असे आव्हान राऊतांनी दिले. राऊत हे गेल्या तीन दिवसापासून मालेगाव दौऱ्यावर असून रविवारी होणाऱ्या सभेपूर्वी त्यांनी मुसलमान कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे उद्धव यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे



