अंधेरी येथील साकीनाका मधील दुकानाला लागलेल्या आगीत दोन कामगारांचा मृत्यू

मुंबई : अंधेरी परिसरात साकीनाका येथील दुकानाला लागलेल्या आगीत राकेश गुप्ता आणि गणेश देवासी या दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघेही हार्डवेअर दुकानातील कामगार होते. आग लागली तेव्हा दुकानात ११ कामगार झोपले होते. त्यापैकी नऊ कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले तर दोघे अडकले होते. यात या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत दुकानाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. मुंबईतील मोठं हार्डवेअर दुकान म्हणून या दुकानाची ओळख होती.
साकीनाका भागात आज पहाटे दोनच्या सुमारास हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. या आगीत हार्डवेअरचे आणि त्याच्या शेजारचे दुकान जळून खाक झाले. ही दुकाने साकीनाका मेट्रो स्टेशनच्या जवळच होती. राज श्री असे या दुकानाचं नाव आहे. ही आग एवढी भीषण होती की दूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी अथक प्रयत्न करुन साडेतीनच्या सुमारास आग नियंत्रणात आणली. त्यानंतर पाच वाजता पुन्हा आगीचा भडका उडाला. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. यानंतर पुन्हा आग आटोक्यात आणण्यात आली असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. लेव्हल १ च्या आगीमुळे संपूर्ण साकीनाका परिसरात धुराचे लोट पसरले होते. मुंबई अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-१ म्हणून घोषित केली आहे.


