अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील गुरुद्वाराबाहेर गोळीबार; गोळीबारात दोघे गंभीर जखमी

न्यूयॉर्क : मागील काही दिवसांपासून खलिस्तानी नेता अमृतपाल सिंह यांच्या अटकेच्या हालचालीने खलिस्तानी समर्थक चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी धुडघूस घालत भारतीय तिरंग्याचा अपमान केला होता.
त्यानंतर आता अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो काउंटीमध्ये एका गुरुद्वाराबाहेर गोळीबार झाल्याचे वृत्त असून या गोळीबारामागे खलितानी समर्थकांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो काउंटीमध्ये असणाऱ्या गुरुद्वारा बाहेर ही गोळीबाराची घटना घडली आहे. तीन लोकांमध्ये गोळीबार झाला, ज्यामध्ये दोन जणांना गोळ्या लागल्या.
दरम्यान, या प्रकारामध्ये जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार चाालू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हल्लोखोर आणि जखमी व्यक्ती एकमेकांच्याओळखीचे असल्याचे सांगण्यात येत असले तरी हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसरा हल्लेखोर फरार झाला आहे.



