क्रिडाविश्व

मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात विजय मिळवून रचला इतिहास

रमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात विजय मिळवून इतिहास रचला. डब्ल्यूपीएलमध्ये विजेतेपद पटकावणारी हरमनप्रीत कौर ही पहिली कर्णधार ठरली. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ७ गडी राखून पराभव केला. या शानदार विजयानंतर हरमनप्रीत कौर खूप आनंदी दिसून आली.

सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान ती म्हणाली की, ”हा एक अद्भुत अनुभव होता, आम्ही खूप मेहनत घेतली आणि आता आम्ही विजयी झालो आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आमची फलंदाजी चांगली होती. संघातील प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून ती पार पाडली.या विजयाचे श्रेय संपूर्ण टीमला जाते.

अंतिम सामन्यात मुंबई संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १३१ धावा केल्या. कर्णधार मेग लॅनिंग (३५) धावा व्यतिरिक्त दिल्लीकडून एकाही फलंदाजाला विशेष धावा करता आल्या नाही. संघाची सलामीवीर शेफाली वर्मा अंतिम सामन्यात फ्लॉप दिसली.

शेफाली वर्मा अवघ्या ११ धावा करून ती स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतली. एलिस कॅप्सीही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली. त्याचवेळी जेमिमा अवघ्या ९ धावा करून बाद झाली. अशा प्रकारे संपूर्ण दिल्ली संघाची टॉप ऑर्डर फ्लॉप झाली. शेवटी, शिखा पांडे आणि राधा यादव यांच्या अर्धशतकी भागीदारीने संघाची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली.

या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून नेट सीवर ब्रंटची नाबाद अर्धशतकी खेळी अप्रतिम होती. तिने ५५ चेंडूत ६० धावा केल्या, ज्यात एकूण ७ चौकारांचा समावेश होता. त्याचवेळी कर्णधार हरमनप्रीत कौरने ३९ चेंडूत ३७ धावा केल्या आणि मुंबईच्या संघाने ७ गडी राखून डब्ल्यूपीएलच्या चषकावर नाव कोरलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button