POLICE : पोलीस सांगून फसवणारा भामटा मुंबई पोलीसांच्या ताब्यात; करत होता पोलीस ओळखपत्राचा वापर

मुंबई गुन्हे वार्ता : ण्टॉप हिल परिसरात राहणाऱया सनी भावेकर (49) याला सगळीकडे खूप मानपान होता. उपनिरीक्षक असल्याने परिसरात सामाजिक कार्यक्रमांना त्याला सन्मानाने बोलावले जायचे. पोलीस म्हणून त्याने चांगलाच दरारा निर्माण केला होता. २०१९ पासून तो त्याच तोऱयात वावरत होता, पण एका क्षुल्लक कारणामुळे सनीचे पितळ उघडे पडले आणि तो भामटा असल्याचे उघडकीस आले.
भोईवाडा वाहतूक विभागात कार्यरत असलेले हवालदार प्रवीण महाले (३८) हे रोड नं ३२ वडाळा येथे दुचाकी टोइंग करण्याचे काम करीत असताना एक इसम तिथे आला व तुम्ही विनाकारण येथील वाहने टोइंग करत आहात असे म्हणून महाले यांच्याशी हुज्जत घालू लागला. त्यावेळी त्याने तो पोलीस अधिकारी असल्याचे सांगून लांबूनच पोलिसांचे ओळखपत्र दाखवले होते. व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे त्याने सांगितले, परंतु महाले यांना संशय आला म्हणून त्यांनी ओळखपत्र पुन्हा दाखवण्याची विनंती केली. तेव्हा ते ओळखपत्र हे पोलीस उपनिरीक्षकपदाचे व सनी भावेकर याच्या नावाचे होते. महाले यांनी त्या व्यक्तीला रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्या व्यक्तीचे नाव अब्दुल हमीद शेख (५३) असे असल्याचे व त्याने दाखवलेले पोलीस ओळखपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी ओळखपत्रावर ज्याचे नाव आहे त्या सनी इस्माईल भावेकर (४९) यालाही पकडले. दोघांच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या. सनीने पोलिसांचे बनावट ओळखपत्र बनविल्याचे स्पष्ट झाले. आता त्या ओळखपत्राच्या जोरावर सनीने नेमके काय काय कारनामे केलेत याचा रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलीस असल्याचे बनावट ओळखपत्र बनवल्यानंतर त्याआधारे सनीने पोलिसांचा पूर्ण गणवेश खरेदी केला. घरावर पोलीस असल्याची पाटी झळकवली, हेल्मेट व दुचाकीवर मुंबई पोलिसांचा लोगो चिकटवला आणि उपनिरीक्षक असल्याच्या तोऱयात तो सर्वत्र वावरू लागला. सर्वांना तो पोलीस असल्याचे सांगत होताच, पण स्वतःच्या पत्नीलादेखील त्याने अंधारात ठेवले. सर्वत्र त्याची पोलीस अशीच ओळख झाल्याने त्याचा त्याने गैरफायदा उचलायला सुरुवात केली. अब्दुलला देखील सनीने खरे सांगितले नव्हते. त्यामुळे अब्दुल कुठेही दमदाटी अथवा आपले काम करून घेण्यासाठी सनीचे ओळखपत्र दाखवत होता, पण अखेर सनीचा पोलीस नावाने सुरू असलेला बनवाबनवीचा खेळ खल्लास झाला. पोलीस असल्यामुळे परिसरातील नागरिक सनीचा सन्मान करायचे. त्याला सामाजिक कार्यक्रमांत अदबीने बोलावले जायचे असे तपासातून समोर आले आहे.
पोलीस भरतीसाठी मुंबईत आलेल्या पाच तरुणांना फसविण्याचा सनीचा डाव होता. ओळखीवर भरतीचे काम करून देतो असे सनीने सांगितले होते. त्या तरुणांचे प्रवेशपत्रदेखील त्याने स्वतःकडे घेतले होते. एका तरुणाकडून सनीने पाच हजार रुपयेदेखील घेतले होते.



