रिक्षा चोरणा-या अट्टल चोराला अटक; आरोपींकडून केल्या १५ रिक्षा हस्तगत

मुंबई गुन्हे वार्ता : मुंबईत रस्त्यालगत उभ्या केलेल्या रिक्षा चोरून त्यांची इतरत्र विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. ४९ वर्षीय आनंद सोनवणे असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून पोलिसांनी १५ रिक्षा हस्तगत केल्या असून पोलीस या संदर्भात याबाबत अधिक तपास करत आहेत.
घाटकोपरच्या पंतनगर परिसरातील गौरीशंकर वाडीत राहणाऱ्या एका रिक्षा चालकाने १४ मार्चला त्याची रिक्षा त्याच्या घराजवळ उभी केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ही रिक्षा अज्ञात इसमाने लंपास केली. याबाबत त्यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिक्षाचा शोध सुरू केला. कल्याण येथे राहणाऱ्या आनंद सोनवणे या आरोपीने ही रिक्षा चोरल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी या आरोपीचा पत्ता काढून त्याला काही दिवसांपूर्वी कल्याण येथून ताब्यात घेतले. तपासात या आरोपीने गुन्ह्याची कबुली देत, घाटकोपर आणि इतर परिसरातून आशाप्रकारे १५ रिक्षा चोरल्याचे पोलिसांना सांगितले. रिक्षा चोरल्यानंतर आरोपी रिक्षाला बनावट नंबर प्लेट लावून तसेच रिक्षाचा चेसी नंबर बदलून या रिक्षांची इतर शहरात विक्री करत होता. त्यानुसार पोलिसांनी या आरोपीकडून सर्व रिक्षा हस्तगत केल्या असून यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.



