महाराष्ट्र भूषण उष्माघात दुर्घटना प्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा; काँग्रेसची मागणी..

मुंबई : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीने? शिंदे सरकार काय लपवत आहे? काँग्रेस २४ तारखेला राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन खारघरचं सत्य सांगणार.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील १४ श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार आणि नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू उष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी विधीमंडळाचं दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावं अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून केली आहे.
नवी मुंबईतील खारघर इथं १६ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात १४ श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारे जवळपास २० लाख श्रीसदस्य राज्यभरातून या कार्यक्रमासाठी आले होते. हा सोहळा राज्य सरकारने आयोजित केला होता. तसंच यासाठी तब्बल १३ कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले गेले. एवढा मोठा खर्च करुनही श्रीसदस्यांसाठी तंबूही बांधण्यात आला नाही, त्यांना कडक उन्हात तासन तास बसावं लागलं, या लोकांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नाही आणि उष्माघाताने अनेक श्रीसदस्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारने केले होते त्यामुळे १४ मृत्यूंची जबाबदारी आयोजक या नात्याने त्यांना नाकारता येणार नाही. या घटनेप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावी अशी मागणी आम्ही आधीच केलेली आहे. या सरकारला जनाची नाही तर मनाची असती तर आतापर्यंत राजीनामे दिले असते पण ते खुर्चीला चिकटून बसले आहेत. शिंदे सरकार खारघर घटनेतील सत्य लपवत आहे. परंतु काँग्रेस पक्ष या घटनेतील सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी यासाठी दिनांक २४ एप्रिल रोजी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन सत्य सांगणार आहे, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटलं आहे.



