महाराष्ट्रमुंबई

मुंबईकरांनो डेंग्यू, मलेरियापासून राहा सावधान ! महानगरपालिकाचे आव्हान

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने नागरिकांमध्ये ताप, सर्दी, थंडी यासारखे संसर्गजन्य आजार वाढीला लागल्याचे दिसून येत आहे. त्यातच अतिसार, डेंग्यू आणि लॅपटोच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. शहरात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाला. तसेच मुंबईमध्ये नळाद्वारे पुरवठा होणारे पाणीही काहीशा प्रमाणात गढूळ येत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मार्गदर्शनाखाली कोविड प्रमाणेच मलेरिया, डेंगी, पावसाळाजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी देशातील सर्व महापालिकांना कोविड लक्ष्याच्या धर्तीवर सुधारित कार्यपद्धती अवलंबली आहे. खासगी रुग्णालये, खासगी प्रयोगशाळा, दवाखाने, खासगी वैद्यकीय, व्यावसायिक यांच्या सहकार्यासह महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या पुढाकाराने पालिका डेंगी, मलेरिया ‘रॅपिड’ शोधमोहीम राबवणार आहे. या मोहिमेमुळे रुग्णसंख्या वाढली, तरी वेळेवर उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच वेळेत ‘निदान वाचवी प्राण’ पद्धतीने पालिका कार्यवाही करणार असून वैद्यकीय व्यावसायिकांसह नागरिकांनी शोध मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे.

डेंग्यू , मलेरिया (हिवताप) यासारख्या आजारांशी मुकाबला करण्यासाठी व त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिका सातत्याने सर्व स्तरावर प्रयत्न करीत असते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आणि उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुरहाडे यांच्या मार्गदर्शनात नियमितपणे सर्वस्तरीय कार्यवाही करतानाच जनजागृतीपर मोहीमदेखील नियमितपणे राबविण्यात येत असते. मात्र अनेकदा डेंगी-मलेरिया यासारख्या आजारांचे निदान लवकर न झाल्याने हे आजार बळावतात आणि प्रसंगी प्राणघातकही ठरू शकतात. हीच बाब लक्षात घेऊन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनात कोविड विरोधातील लढ्याच्या धरतीवर डेंग्यू, मलेरिया विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. याअंतर्गत डेंगी, मलेरियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा मोहीम स्वरूपात शोध घेण्याचे व लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या चाचणीमध्ये डेंगी, मलेरियाचे निदान झालेल्या रुग्णांनी वेळेवर औषध घ्यावे व आवश्यक ती काळजी घ्यावी, यासाठी ‘टेलिफोनिक फॉलोअप’ घेता यावा, याकरिता सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षांमार्फत कार्यवाही करण्याचे निर्देशही डॉ. शिंदे यांनी दिले आहेत.

डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनात आयोजित विशेष बैठकीदरम्यान घेण्यात आलेले निर्णय सर्व खासगी प्रयोगशाळा व रुग्णालये यांनी त्यांच्याकडील सर्व डेंगी व मलेरिया रुग्णांची माहिती पालिकेला देणे बंधनकारक असेल, असे परिपत्रक कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत काढण्यात आले आहे. कोविड काळात विभाग स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘कोविड वॉर रूम’चा उपयोग डेंग्यू, मलेरिया व पावसाळी आजार यांच्या प्रतिबंधासाठी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक विभागीय ‘वॉर रूम’मध्ये एक डॉक्टर, एक समन्वयक आणि एक डेटा एन्ट्री ऑपरेटर दोन सत्रांमध्ये काम करतील. दिनांक १ जुलै २०२३ पासून तत्काळ लागू करण्यात आलेल्या सुधारित कार्यपद्धतीअंतर्गत कोविडच्या धर्तीवर घरोघर जाऊन शोधमोहीम घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य केंद्रामार्फत केलेल्या शोध मोहिमेंतर्गत डेंगी किंवा मलेरियाचा रुग्ण आढळून आलेल्या कुटुंबासह जवळपासच्या परिसरातील सुमारे २५० घरांमधील नागरिकांचे ‘रॅपिड’ सर्वेक्षण करून तापसदृश रुग्णांचे रक्तनमुने संकलित करून त्याच दिवशी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. तापसदृश रुग्णांना नजीकच्या मनपा रुग्णालयात संदर्भित केले जात आहे. रॅपिड सर्वेक्षण करताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, कीटक नियंत्रण अधिकारी, कीटक नियंत्रण विभाग आणि मलेरिया संनिरीक्षण विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबविण्याचे निर्देश, जेणेकरून एकाच वेळी रुग्ण शोधणे, रुग्णांवर उपचार करणे आणि डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे यासारखी कार्यवाही एकत्रितपणे करणे शक्य होईल. तसेच अतिजोखमीचे महापालिका विभाग शोधून त्यावर कार्यवाही करणार आहे. नागरिकांना डासांची उत्पत्तीस्थळे कशी शोधावी व ती कशी नष्ट करावी, याबाबत संयुक्त मोहिमेदरम्यान व्यापक जनजागृती व प्रचार करणे तसेच खासगी इमारती, गृहनिर्माण संस्था या ठिकाणी एएलएमबरोबर बैठका आयोजित करणे, बांधकामाच्या ठिकाणी बैठका आयोजित करणे व जनजागृती करणे तसेच कार्यालयीन ठिकाणी बैठका आयोजित कराव्यात.

महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला सहकार्य करण्याचे पालिकेनेही नागरिकांना आवाहन केले आहे.

१. नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व सोसायटीच्या परिसरात कुठेही साचलेले पाणी असणार नाही, याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते व डासांची उत्पत्तीस्थळे तयार होतात, ही बाब लक्षात घेऊन साचलेले पाणी आढळून आले असता तत्काळ नष्ट करण्याचे पालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे.
२. टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या व बाटल्यांची झाकणे, झाडांच्या कुंड्या व त्या कुंड्यांखालील ताटल्या, फ्रीजच्या खालील डिफ्रॉस्ट ट्रे यात साचलेले पाणी असणार नाही याची दररोज पाहणी करावी व दक्षता घ्यावी.
३. फेंगशुई, मनी प्लांट यासारख्या शोभेच्या रोपट्यांचे पाणी नियमितपणे बदलण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
४. कोविड विरोधातील लढ्याचे अनुभव लक्षात घेऊन करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणामुळे रुग्णांची संख्या वाढू शकेल. मात्र ही वाढलेली संख्या बघून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वस्तूतः या मोहिमेमुळे डेंगी, मलेरिया विषयक लवकर निदान झाल्याने आणि लवकर औषध उपचार सुरू झाल्याने रुग्णांचे प्राण वाचविणे आणि ते लवकर बरे होण्यास निश्चितच बळ मिळणार आहे.
कीटकजन्य आजार व मलेरिया आणि डेंगी प्रतिबंधासाठी पालिकेने सल्ला दिला असून मुंबईकर नागरिकांनी पुढील गोष्टी करण्याचा सल्ला पालिकेने नागरिकांना दिला आहे. दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिकारक (Mosquito Repellent ) औषधांचा वापर करावा. कुलर आणि लहान कंटेनरमधून नियमितपणे पाणी काढा, सर्व जलस्त्रोत पूर्णपणे झाकलेले आहेत, याची खात्री करा. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे काढून टाका, यासह बाल्कनीत प्लॅट, एसी ट्रे, मातीची भांडी, फ्रीज ट्रे, धुतलेली भांडी ठेवणारे स्वयंपाकघरातील रॅक, खचाखच भरलेले स्वयंपाकघर आणि बाथरूमचे नाले, कूलर, बाथरूम आणि टाक्यांमध्ये गळती, उघड्या बादल्या किंवा पाण्याचे डबे जे नियमितपणे वापरले जात नाहीत. शोभिवंत फुलांच्या फुलदाण्या किंवा पाण्यासह शोपीस, बोन्साई वनस्पती आणि इनडोअर वनस्पती, डासांपासून बचाव करण्यासाठी पूर्ण बाजूचे कपडे घालावे.

हे न करण्याचा पालिकेचा सल्ला : जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू जमा करणे टाळा, कारण त्यातून डासांची उत्पत्ती होते. डासांची पैदास होऊ नये म्हणून पाण्याचे डबे बंद ठेवा. जलजन्य आजारांसाठी (गॅस्ट्रो, हेपेटायटिस, टायफाइड)

खबरदारीचे उपाय : गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरच्या उघड्या पदार्थाचे सेवन करणे टाळा. खाण्यापूर्वी स्वच्छ हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापरा करा. पाणी उकळून प्यावे. एच१ एन१ च्या प्रतिबंधासाठी जनमार्गदर्शक सूचना गर्दीची ठिकाणे टाळा. शिंकताना किंवा खोकताना रुमालाचा योग्य वापर करावा. वारंवार साबणाने हात धुणे. डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा. तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास किंवा त्वचा/ओठ निळे पडणे अशी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ मनपाच्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये जाऊन डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. उपचारांना उशीर केल्याने गुंतागुंत होऊ शकते आणि मृत्यूचा धोका वाढू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button