विरारच्या फुलपाडा पापडखिंड धरणात तीन मुले बुडाली, एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

विरार : विरारच्या फुलपाडा येथील पापडखिंड धरणात पोहण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाली. त्यापैकी स्थानिकांनी दोघा मुलांना वाचवले, मात्र ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली
विरार पूर्वेला फुलपाडा येथे महापालिकेचे पापडखिंड नावाचे धरण आहे. रविवारी सुट्टी असल्याने वसंत बोराडे पत्नी, मुलगा तसेच शेजारील अन्य दोन मुलांसह पापडखिंड धरणावर फिरायला गेले होते. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ओम बोराडे (११) आणि त्याचे दोन मित्र अंश (१२) आणि वंश (११) पाण्यात बुडू लागले. स्थानिकांच्या मदतीने वंश आणि अंश यांना वाचविण्यात यश आले. मात्र ओम पाण्यात बुडून मरण पावला. याप्रकरणी रात्री ११ वाजता विरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पापडखिंड धरणातून विरार शहराला दररोज १ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. या धरण परिसरात फिरण्यासाठी तसेच पाण्यात पोहण्यासाठी बंदी आहे. मागील आठवड्यात याच धरणात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.



