गुन्हे

ठाण्यात NCC ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण; ‘त्या’ विद्यार्थ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

ठाणे : ठाण्यातील नामांकित जोशी-बेडकर आणि बी.एन. बांदोडकर या महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणी प्रकरणी पोलिसांच्या तक्रारीनंतर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मारहाण करणारा तरुण भांडुप येथील महाविद्यालयातील असून तो एनसीसीचे प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयात येत असल्याचे समोर आले आहे. तसेच मारहाणीचे चित्रीकरण २६ जुलै या दिवशीचे आहे. दरम्यान, पोलिसांनी काही विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, चित्रीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यीनीची जबाब घेण्यास सुरूवात केली आहे. या मारहाणीचे राजकीय पडसादही उमटले.

ठाण्यात युवासेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस, मनसे यासह विविध पक्षांनी महाविद्यालयाबाहेर तसेच महाविद्यालय शिरुन आंदोलन केले. शिंदे गटाने महाविद्यालयाला कूलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर महाविद्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये काहीसे दडपणाचे वातावरण होते. दररोजच्या तुलनेत महाविद्यालयाच्या आवारात शुकशुकाट असल्याचे चित्र होते.

ठाणे शहरात जोशी बेडेकर आणि बी. एन. बांदोडकर महाविद्यालयात मागील ४० वर्षांपासून एनसीसी कार्यरत आहे. जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना सैन्य प्रशिक्षणपूर्वीचे धडे देण्यात येतात. त्यात विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. परंतु या विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांदोडकर महाविद्यालयाच्या आवारात हा प्रकार घडला आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साचले असून तिथे चिखलही आहे. तिथे एनसीसीच्या आठ ते नऊ विद्यार्थ्यांनी जमिनीवर डोके ठेवले आहे. या विद्यार्थ्यांच्या कमरेखालील भागावर विद्यार्थी प्रमुख लाकडी दांडक्याने अमानुषपणे मारहाण करीत आहे, असे चित्रफितीत दिसून येत आहे. पालकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गटातील युवासेनेचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाने महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले. शिंदे गटाने महाविद्यालयाबाहेरील प्रवेशद्वाराला कूलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण चिघळले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्यांची भेट घेतली. तर ठाकरे गटातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिमंडळ एकचे उपायुक्त गणेश गावडे यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

संबंधित तरुण हा भांडुप येथील एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. मागील काही दिवसांपासून तो एनसीसीची प्रशिक्षण देण्यासाठी जोशी बेडेकर आणि बी.एन. बांदोडकर महाविद्यालयात येत आहे. पोलिसांकडून जोशी-बेडेकर आणि बांदोडकर महाविद्यालयातील काही शिक्षक, एनसीसीचे विद्यार्थी, चित्रीकरण करणाऱ्या तरुणीचा जबाब घेतला जात आहे. एनसीसीनेही संबंधित तरुणाचे निलंबन केले असून एनसीसीकडूनही त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणात मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांकडून तक्रार दाखल झाली नसल्याने पोलिसांनी स्वत: तक्रार देऊन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. राजकीय वातावरण चिघळल्यानंतर पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवारात बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button