राज्यातील धरणांत केवळ ६१ टक्केच पाणी

राज्यात सर्वदूर पावसाने विश्रांती घेतल्याने सुमारे तीन हजार धरणांमधून ६१.५८ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत पाणीसाठ्यात १९ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. राज्यात पुणे, नाशिक, अमरावती वगळता औरंगाबाद विभागातील स्थिती अत्यंत बिकट असल्याचे पाणीसाठ्यावरून जलसंपदा विभागाने निरीक्षण नोंदवले आहे.
राज्यात सुमारे तीन हजार धरणांची १४३० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी क्षमता आहे. त्यापैकी आजमितीला राज्यात ८८० टीएमसी एवढे धरणात पाणी जमा झाले आहे. म्हणजेच ६१.५८ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आज राज्यातील धरणांमध्ये १९ टक्क्यांची तूट आहे, असे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
नागपूर विभागात १७, अमरावती विभागात १०, औरंगाबाद विभागात ४४, नाशिकमध्ये २३, पुणे विभागात ३५ एवढी मोठी धरणे आहेत; तसेच कोकण विभागातील ११ मोठ्या धरणांचा समावेश आहे.


