मुंढवा पोलिसांची कामगिरी; घरापासून दुरावलेल्या २ चिमुकल्यांना मिळवून दिले आईबाबा

पुणे गुन्हेवार्ता : घरापासून दुरावलेली तीन ते चार वर्षाची दोन मुले पुन्हा त्यांच्या आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात मुंढवा पोलिसांना यश आले. हरवलेली दोन मुलं सुखरुप मिळाल्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी पालकांनी त्यांना जवळ घेत गळाभेट घेतली. पालकांनी यावेळी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केशवनगर भागामध्ये शेजारी राहणाऱ्या चैताली संदीप मोरे (वय-३०) व सुधिर महादेव शिंदे (वय-३२ रा. जनसेवा बँकेजवळ, पोटे हॉस्पिटल समोर, केशवनगर, पुणे) यांनी केशवनगर पोलीस चौकीत मल्हार संदीप मोरे (वय-४), रोहीत सुधीर मोरे (वय-३) हे दोघे घरासमोर खेळत असताना रस्ता चुकून कोठेतरी भटकले असल्याची तक्रार दिली.
त्यावेळी पोलीस चौकी मधील पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे यांनी त्या दोघांना धिर दिला. तसेच मुलांची वय लक्षात घेता या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना माहिती देण्यात आली. ताम्हाणे यांनी या दोन मुलांचे फोटो पोलीस ठाणे तसेच नागरिकांच्या ग्रुपवर शेअर करुन मुलांचा शोधा घेण्याबाबत पोलिसांना आदेश दिले.
केशवनगर पोलीस चौकीतील पोलिसांच्या पथकाने शिवाजी चौक, पवार वस्ती, कुंभार वाडा, नदीपात्र भाग व इतर भागात मुलांचा शोध घेतला. एक ते दीड तास मुलांचा शोध घेतल्यानंतर मुले कुंभारवाडा नदीपात्राच्या परिसरात घाबरून भटकत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मुलांना पोलीस चौकीत आणले. यावेळी पोलीस चौकीत असलेल्या पालकांना मुलांना पाहून डोळ्यातून आनंद अश्रू आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन लहान मुले आई वडिलांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे यांच्या सुचनेप्रमाणे
पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे, पोलीस अंमलदार सचिन बोराटे, प्रविण कोकणे, निलेश पालवे यांनी केली.



