महाराष्ट्र

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार बेकायदा राहणाऱ्या विदेशी नागरिकांच्या विरोधात धाडसत्र सुरु

नवी मुंबई : गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबईत सर्वत्र बेकायदा राहणाऱ्या विदेशी नागरिकांच्या विरोधात आज दुपारपासून धाडसत्र सुरु केले आहे. ज्यांची व्हिसाची मुदत संपली आहे अशा सर्वांची झाडाझडती सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणी १५ पेक्षा अधिक विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यात सर्वाधिक नागरिक हे आफ्रिका खंडातील देशांचे आहेत.

नवी मुंबईत राहणारी मात्र ज्यांची व्हिसा मुदत संपली आहे अशा सर्व संशयित लोकांना शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सर्वत्र धाडसत्र सुरु केले आहे. वाशीतील जुहू गाव, जुहू गाव खाडी परिसर, बोनकोडे खैरणे गाव तसेच पनवेल खारघर परिसरातील शहरापासून नजीक असलेली गावे येथे शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. या मध्ये वाशीतील जुहू गाव येथे पाच नायझेरिया देशाच्या नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतरत्र १० पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली. या नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यावरच किती व्यक्ती बेकायदा भारतात वास्तव्य करतात हे समोर येईल असेही पोलिसांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले की, हे धाडसत्र नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सर्वत्र सुरु आहे. पारपत्र कायद्यानुसार हि कारवाई सुरु आहे. यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सर्वत्र शोधाशोध सुरु असल्याने अद्याप कुठे कुठे आणि किती तसेच कुठल्या देशातील नागरिक पकडले गेले हे सांगू शकत नाही. कारवाई संपल्यावर सर्व माहिती समोर येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button